नवदुर्गा सॉ-मिल प्रकरण विधानसभेत

By Admin | Updated: January 14, 2017 00:09 IST2017-01-14T00:09:22+5:302017-01-14T00:09:22+5:30

वलगाव मार्गावरील नवदुर्गा सॉ-मिलच्या संचालकांनी एकच लाकूड कापण्याच्या परवानगीच्या आधारे अवैध वृक्षतोड केली.

Navdurga Saw-Mill Case in Legislative Assembly | नवदुर्गा सॉ-मिल प्रकरण विधानसभेत

नवदुर्गा सॉ-मिल प्रकरण विधानसभेत

सुनील देशमुखांचा अतारांकित प्रश्न : मुख्य वनसंरक्षकांना माहिती पाठविण्याच्या सूचना
अमरावती : वलगाव मार्गावरील नवदुर्गा सॉ-मिलच्या संचालकांनी एकच लाकूड कापण्याच्या परवानगीच्या आधारे अवैध वृक्षतोड केली. हे अवैध लाकूडकटाईप्रकरण राज्याच्या विधीमंडळात पोहोचले असून आ. सुनील देशमुखांनी यासंंदर्भात अतारांकित प्रश्न सादर केला आहे.
अतारांकित प्रश्न क्र. ७३६६१ अन्वये स्थानिक वलगाव मार्गावरील टॉवरलाईन नजीकच्या नवदुर्गा सॉ-मिलमध्ये १० ट्रक अवैध लाकूड आढळल्याचे प्रकरण मांडले. येथील जिल्हा स्त्री रूग्णालय परिसरात इमारतीचे नवीन बांधकाम करताना अडथळा ठरणारे वृक्ष कापण्यात आले होते. त्याकरिता महापालिका वृक्षप्राधिकरण समितीची परवानगी देखील घेण्यात आली होती. वृक्षकटाईची निविदा काढण्यात आली होती. झाडे कापण्याचे कंत्राट नवदुर्गा सॉ-मिलने घेतले होते. मात्र, डफरीनच्या आवारातील झाडे कापण्यासाठी घेतलेल्या परवानगीच्या आधारेच शहरातील इतर झाडांचीही सर्रास कत्तल केली जात होती.
सहा महिन्यांपर्यंत यापरवानगीचा आधार घेऊन नवदुर्गा सॉ-मिलच्या संचालकांनी वनाधिकाऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक केली. मात्र, वनाधिकाऱ्यांनी नवदुर्गा सॉ-मिलमध्ये धाडसत्र राबविले असता चक्क १० ट्रक अवैध लाकूड आढळले होते. त्यानंतर वनाधिकाऱ्यांनी चौकशी आरंभली. मात्र, काही वनाधिकाऱ्यांनी नवदुर्गा सॉ-मिलच्या संचालकांना ‘सॉफ्ट कार्नर’ देत वनगुन्हे दाखल केले नाहीत. त्यानंतर अवैध लाकूड प्रकरण ‘लोकमत’ने सातत्याने लोकदरबारात रेटून धरले. शहरात कापले गेलेले लाकूड आरागिरणीत आणले जात असेल तर त्याकरिता वाहतूक परवानगीची आवश्यकता नाही. मात्र, सहा महिन्यांपूर्वीच्या परवानगीवर लाकूडकटाई कशी सुरू राहू शकते, ही बाब देखील आ. सुनील देशमुख यांनी उपस्थित केला आहे.

वनविभागात अनागोंदी कारभार सुरु असल्यामुळे अवैध लाकूड प्रकरणाचा अतारांकित प्रश्न विधिमंडळात उपस्थित केला आहे. याविषयी सत्यता आता विधानभवनात चर्चिली जाईल.
-सुनील देशमुख, आमदार, अमरावती

Web Title: Navdurga Saw-Mill Case in Legislative Assembly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.