आयुक्तांसाठी नवी कोरी होंडासिटी
By Admin | Updated: October 28, 2016 00:14 IST2016-10-28T00:14:49+5:302016-10-28T00:14:49+5:30
महापालिका आयुक्त हेमंत पवार यांच्यासाठी ८ लाखांचे चारचाकी वाहन खरेदी करण्यात आले.

आयुक्तांसाठी नवी कोरी होंडासिटी
एकाच वर्षात दोन वाहने : जुने वाहन मार्डीकरांकडे
अमरावती : महापालिका आयुक्त हेमंत पवार यांच्यासाठी ८ लाखांचे चारचाकी वाहन खरेदी करण्यात आले. एकीकडे महापालिकेची आर्थिक घडी बिघडली असताना प्रशासनाने हा खर्च करायला नको होता, अशी प्रातिनिधिक प्रतिक्रिया उमटली आहे.
चंद्रकांत गुडेवार यांच्या बदलीनंतर हेमंत पवार यांनी आयुक्त पदाची सूत्रे स्वीकारली. लगेचच त्यांच्यासाठी ७ लाख ९९ हजार ८५२ रुपये खर्च करून होंडासिटी चारचाकी वाहन खरेदी करण्यात आले. तत्कालीन आयुक्तांकरिता जून २०१५ मध्ये नवीन वाहन खरेदी केले होते. ‘ड’ वर्ग महापालिकेची अवस्था पाहता येथे शिक्षकांचे वेतन आणि कर्मचाऱ्यांच्या थकबाकीसाठी प्रशासनाला आर्थिक कसरत करावी लागते. प्रशासनाचा दांडगा अनुभव असलेल्या पवारंसमोर वेतन आणि थखबाकीच्या अनुषंगाने निदर्शने- निवेदनांची भरमार असते. अशा परिस्थितीत आयुक्तांनी ८ लाखांच्या वाहन खरेदीला कसे बळी पडलेत. अशा प्रश्न महापालिका वर्तुळात उपस्थित करण्यात आला आहे. महापालिकेच्या कार्यशाळा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, स्थायी समितिने ठराव क्र. १७ अन्वये स्थायी समिति सभापतीसाठी नवीन वाहन खरेदी करण्याचा ठराव करण्यात आला होता. मात्र ११ जून ला स्थायीचे सभापती अविनाश मार्डीकर यांनी प्रशासनाला पत्र लिहून आयुक्तांकरिता नवीन वाहन घेण्याचे सुचविले व आयुक्तांकडील ते वाहन स्थायी समिती सभापतींना देण्याचे कळविण्यात आले. त्याअनुषंगाने गुडेवार यांच्या कार्यकाळात घेण्यात आलेले चारचाकी वाहन मार्डीकरांना देण्यात आले व विद्यमान आयुुक्तांसाठी ७.९९ लाख रुपये खर्च करून नवीन वाहन घेण्यात आले, असा दावा कार्यशाळा विभागाने केला आहे. (प्रतिनिधी)
दालनावर १ लाखांचा खर्च
महापालिका आयुक्तांच्या दालनात फर्निचर व सुशोभिकरण्याकरिता १ लाख ४०० रुपए खर्च करण्यात आल्याची माहिती भांडार अधीक्षकांनी दिली आहे. आयुक्तांच्या दालनातील जुन्या खुर्च्याच्या जागा नव्या खुर्चींनी घेतली. आयुक्तांच्या खुर्चीसह दालनातील इतर खुर्च्याही बदलविण्यात आल्या.