कोरोनामुळे बदलेले गुरुजींच्या कामांचे स्वरूप..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:11 IST2021-05-30T04:11:27+5:302021-05-30T04:11:27+5:30
अमरावती : गत दीड वर्षांत कोरोनाच्या संकटामुळे उद्योगधंदे, व्यवसाय, शेती, नोकरी अशा अनेक क्षेत्रांवर आपली मोहर उमटवली आहे. अनेकांचे ...

कोरोनामुळे बदलेले गुरुजींच्या कामांचे स्वरूप..!
अमरावती : गत दीड वर्षांत कोरोनाच्या संकटामुळे उद्योगधंदे, व्यवसाय, शेती, नोकरी अशा अनेक क्षेत्रांवर आपली मोहर उमटवली आहे. अनेकांचे व्यवसाय उद्योगधंदे बुडाले आहेत. यात कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे. गोरगरिबांना जगणे कठीण झाले आहे. अशातच शिक्षकांच्या कामाचे स्वरूपच बदलून टाकले आहे.
कोरोनामुक्तीच्या लढ्यात शिक्षकांवर आरोग्य तसेच पोलीस यंत्रणेने बरोबर काम करण्याची जबाबदारी शासनाने सोपविले आहे. त्यामुळे एरवी शाळेत दिसणारे शिक्षक आता तपासणी नाक्यावर पोलिसांसोबत तसेच काेविड केअर सेंटर, प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच उपजिल्हा रुग्णालयात कर्तव्य बजावताना दिसत आहेत. त्यामुळे खडू-फळा-डस्टर ऐवजी हाती थर्मल गन अन् ऑक्सिमीटर शिक्षकांच्या हाती दिसू लागले आहे. कोरोनामुक्तीच्या लढायांमध्ये पोलीस व डॉक्टरांसोबत शिक्षक गेल्या वर्षभरापासून जबाबदारी पार पाडत आहेत. घरोघरी जाऊन माहिती घेणे, तपासणी करणे, माहिती शासनाला कळविणे, नागरिकांना लस घेण्यास प्रवृत्त करणे, कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना बाबत प्रबोधन करणे अशा प्रकारचे कामे ते करीत आहेत. शिक्षकही सोपविलेली जबाबदारी चोखपणे पार पाडत आहेत. थोडक्यात आरोग्य तसेच पोलिस प्रशासनाचे प्राथमिक कार्य शिक्षक पार पाडू लागले आहे. ही जबाबदारी पार पाडताना शासन तसेच प्रशासनाकडून मात्र शिक्षकांच्या सुरक्षिततेची कोणतीही काळजी घेण्यात आली नाही. त्यामुळे राज्यात या ड्युटीवर असणारे अनेक शिक्षक मृत्युमुखी पडले आहेत. कोणताही अनुभव नसताना पोलीस तसेच आरोग्य यंत्रणेसोबत काम करण्याची जबाबदारी शिक्षकांना देणाऱ्या शासनाने त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी घेतली पाहिजे. या शिक्षकांना संरक्षण द्यावे, अशी मागणी शिक्षक वर्गातून होत आहे.
कोट
कोरोनाच्या संकटकाळात प्राथमिक शिक्षक शासन व प्रशासनाने दिलेल्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडत आहेत. त्यामुळे शासनाकडून कोविड विमा कवच लागू करून त्याचा लाभ मृत्युमुखी पडलेल्या शिक्षकाच्या कुटुंबाला तातडीने द्यावा व लसीकरण प्राधान्याने करावे.
- राजेश सावरकर, राज्य प्रतिनिधी, प्राथमिक शिक्षक समिती