मेळघाट व्याघ्र अभयारण्यातील वनरक्षकास राष्ट्रीय पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 06:00 IST2020-03-16T06:00:00+5:302020-03-16T06:00:50+5:30
मेळघाट व्याघ्र अभयारण्यातील वाइल्ड लाइफ क्राइम सेलमध्ये कार्यरत वनरक्षक आकाश सारडा व पांढरकवडा वनविभागात कार्यरत वनरक्षक प्रमिला इस्तारी सिडाम या महाराष्ट्रातील दोन कर्मचाऱ्यांना हा पुरस्कार घोषित झाला. राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाचे डेप्युटी इन्स्पेक्टर जनरल आॅफ फॉरेस्ट सुरिंंदर मेहरा यांनी ११ मार्च रोजी या पुरस्कारांची घोषणा केली.

मेळघाट व्याघ्र अभयारण्यातील वनरक्षकास राष्ट्रीय पुरस्कार
लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : भारत सरकारच्या पर्यावरण, वन व जलवायू परिवर्तन मंत्रालय तथा राष्ट्रीय व्याघ्र संरक्षक प्राधिकरणाकडून व्याघ्र संवर्धनात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या देशपातळीवरील सहा कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पुरस्कार घोषित करण्यात आले आहेत. यात महाराष्ट्रातील दोन वनरक्षकांचा समावेश आहे.
मेळघाट व्याघ्र अभयारण्यातील वाइल्ड लाइफ क्राइम सेलमध्ये कार्यरत वनरक्षक आकाश सारडा व पांढरकवडा वनविभागात कार्यरत वनरक्षक प्रमिला इस्तारी सिडाम या महाराष्ट्रातील दोन कर्मचाऱ्यांना हा पुरस्कार घोषित झाला. राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाचे डेप्युटी इन्स्पेक्टर जनरल आॅफ फॉरेस्ट सुरिंंदर मेहरा यांनी ११ मार्च रोजी या पुरस्कारांची घोषणा केली.
पहिला पुरस्कार
मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या ४६ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदा वनरक्षकास राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. यात देशपातळीवर गौरव प्राप्त करणारा महाराष्ट्रातील हा पहिला व्याघ्र प्रकल्प ठरला आहे.
उल्लेखनीय कार्य
मेळघाट व्याघ्र अभयारण्यातील आकाश सारडा यांनी सन २०१७ मध्ये पोलिसांच्या मदतीने सहा आरोपींना सहा गाड्यांसह पकडून दिले. ते दुतोंड्या सापाच्या तस्करीत संलग्न होते. व्याघ्र प्रकल्पाच्या वाइल्ड लाइफ क्राइम सेलमध्ये कार्यरत असताना त्यांनी २०१९ मध्ये चिखलदरा व चौराकुंडमधील शिकाºयांना पकडून वाघाच्या कातडीसह वाघनख व दात हस्तगत करण्यात उल्लेखनीय कार्य केले.