थोर पुरुषांच्या यादीत राष्ट्रसंत
By Admin | Updated: July 15, 2016 00:27 IST2016-07-15T00:27:44+5:302016-07-15T00:27:44+5:30
युद्धजन्य स्थितीत देशाच्या सीमेवर जाऊन भजनाद्वारे सैनिकांचे मनोबल वाढविणारे व जगाला ग्रामोद्धाराचा मुलमंत्र देणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज....

थोर पुरुषांच्या यादीत राष्ट्रसंत
शासनाला उशिरा जाग : शासकीय- निमशासकीय कार्यालयात लागणार छायाचित्र
गजानन मोहोड अमरावती
युद्धजन्य स्थितीत देशाच्या सीमेवर जाऊन भजनाद्वारे सैनिकांचे मनोबल वाढविणारे व जगाला ग्रामोद्धाराचा मुलमंत्र देणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे नाव २८ थोरपुरुष व राष्ट्रसंत यांच्या यादीत समावेश करण्यात आले आहे. त्यामुळे काही वर्षांपासूनची मागणी पूर्ण झाल्याने गुरुदेव भक्तांमध्ये आनंद व्यक्त करण्यात आला.
मागणी आल्यास शासकीय व निमशासकीय कार्यालयात छायाचित्र प्रदर्शित करण्यास शासनाची मान्यता राहणार असल्याचा निर्णय सामान्य प्रशासन विभागाचे अपर सचिव र. भ. पांचाळ यांच्या स्वाक्षरीने मंगळवारी जाहीर करण्यात आला आहे.
विसाव्या शतकातील राष्ट्रपुरुष व राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या देशसेवेचा गौरव करुन व कार्याने प्रभावित होऊन देशाचे पहिले राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद यांनी त्यांना ‘राष्ट्रसंत’ या पदवीने सन्मानित केले होते. राष्ट्रसंतांनी स्वातंत्र्यपूर्वकाळात देशभर जनजागृती करुन स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय सहभाग नोंदविला होता. मात्र राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे नाव देशाच्या थोर पुरुषांच्या यादीत समावेश नव्हते. याविषयी गुरुदेवभक्तांनी दोन वर्षापूर्वी अमरावती विभागीय आयुक्तांना निवेदन दिले होते. राज्यशासन सध्या राबवित असलेल्या योजना विषयी राष्ट्रसंतांनी ५० वर्षापुर्वीच लिखाण केले आहे. महाराजांची ग्रामगीता ही ग्रामविकासाची संजीवनी ठरली आहे. महाराजांचे महान कार्याचा गौरव व्हावा, यासाठी गुरुदेव सेवा मंडळाच्या देशभऱ्यातील ३० हजार शाखांनी शासनाकडे निवेदन पाठविले होते. मात्र, थोर पुरुष व राष्ट्रसंताच्या यादीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे नाव समाविष्ट करण्यास शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने नकार दिला होता. सद्य:स्थितीत या यादीमध्ये २८ थोर पुरुष व राष्ट्रपुरुषांचा समावेश आहे, ही संख्या विचारात घेता आणखी छायाचित्र लावण्यासाठी शासकीय कार्यालयात जागेचा प्रश्न निर्माण होईल. असे उत्तर शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने दिले होते. परंतु देशभरातील लाखो गुरुदेवभक्तांच्या भावनेचा रेटा कायम असल्याने गुरुदेव भक्तांची मागणी मान्य झाली.
या थोरपुरुषांचे फोटो लावण्यास परवानगी
महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल, फक्रुद्दीन अली अहमद, लालबहादूर शास्त्री, इंदिरा गांधी, दादाभाई नौरोजी, महात्मा ज्योतिबा फुले, राजीव गांधी, पंडित जवाहरलाल नेहरु, डॉ. झाकीर हुसेन, यशवंतराव चव्हाण, व्ही. व्ही. गिरी, वसंतराव नाईक, लोकमान्य टिळक, नेताजी सुभाषचंद्र बोस, वसंतदादा पाटील, डॉ.एस. राधाकृष्णन, छत्रपती शिवाजी महाराज, अटलबिहारी वाजपेयी, के. आर. नारायणन, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, डॉ. मनमोहन सिंग, राजर्षी शाहू महाराज, डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम, प्रतिभाताई पाटील, प्रणव मुखर्जी व आता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या थोर पुरुष व महापुरुषांचे प्रतिमा शासकीय कार्यालयात लावण्यास परवानगी आहे.
असा आहे शासनादेश
४राष्ट्रपुरुष ‘थोर व्यक्ती यांची छायाचित्रे शासकीय, निमशासकीय कार्यालयामध्ये प्रदर्शित करण्यासंदर्भात वेळोवेळी आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे छायाचित्र शासकीय/ निमशासकीय कार्यालयामध्ये प्रदर्शित करण्याच्या अनुषंगाने लोकप्रतिनिधी. संस्था यांच्याकडून प्राप्त झालेल्या विनंतीच्या अनुषंगाने निर्णय घेण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. या शासन निर्णयाच्या अन्वये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे छायाचित्र शासकीय / निमशासकीय कार्यालयामध्ये लावण्याबाबत मागणी आल्यास त्याप्रमाणे छायाचित्र प्रदर्शित करण्यास शासनाची मान्यता राहील.