नरखेड रेल्वे पुलाचे एकाच दिवशी दोनदा उद्घाटन
By Admin | Updated: December 24, 2016 01:36 IST2016-12-24T01:36:13+5:302016-12-24T01:36:13+5:30
बडनेरा मार्गावरील नरखेड रेल्वे मार्गावरील उड्डाणपुलाचे बांधकाम अद्याप अपूर्ण असताना शुक्रवारी

नरखेड रेल्वे पुलाचे एकाच दिवशी दोनदा उद्घाटन
लढाई राजकीय श्रेयाची : रवि राणानंतर अडसुळांनीही फोडले नारळ
अमरावती : बडनेरा मार्गावरील नरखेड रेल्वे मार्गावरील उड्डाणपुलाचे बांधकाम अद्याप अपूर्ण असताना शुक्रवारी लोकप्रतिनिधींनी नाट्यमयरित्या पुलाचे उद्घाटन करून तो वाहतुकीसाठी खुला करण्याची किमया देखील केली. सुरूवातीला आ. रवि राणा यांनी फित कापून पुलाचे लोकार्पण केले तर काही वेळाने खा.आनंदराव अडसूळ यांनी नारळ फोडून पुलाचा शुभारंभ झाल्याचे जाहीर केले. याबाबत रेल्वे प्रशासन अनभिज्ञ आहे, हे विशेष.
या पुलाचे बांधकाम मागील सात वर्षांपासून सुरू आहे. मात्र, संथगतीमुळे ते वेळेत पूर्ण झाले नाही. परिणामी कंत्राटदाराने पुलाच्या बांधकामाचा अवधी वाढवून मागितला. सध्या यामार्गाच्या डांबरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. परंतु अमरावती- बडनेरा मार्गावर नरखेड रेल्वे पुलाच्या अर्धवट बांधकामामुळे वाहन चालक, नागरिक आणि प्रवाशांना होणाऱ्या जीवघेण्या त्रासाचे कारण पुढे करून शुक्रवारी दुपारी १२ वाजता आ. रवि राणा यांनी हा पूल वाहनांसाठी सुरु केला.
नरखेड रेल्वे पुलावरून अर्धा किलोमीटर अंतर कापताना वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागते. यापुलाचे बांधकाम संथगतीने सुरू असल्याचे प्रसार माध्यमांनी लक्षात आणून दिले. तरीही खासदारांना जाग आली नाही. एका पुलाच्या बांधकामाला ७ वर्षे लागत असतील तर ही शोकांतिका आहे. त्यामुळे नरखेड रेल्वे पुलाचा शुभारंभ करुन तो एका बाजुने वाहतुक ीसाठी खुला करण्यात आला.
- रवि राणा आमदार, बडनेरा
नरखेड रेल्वे मार्गावरील पुलाचे फीत कापून उद्घाटन करताना आ. रवी राणा व त्यांचे समर्थक. त्यानंतर सिटीबस चालकाच्या हस्ते हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.
नरखेड रेल्वे मार्गाच्या पूर्णत्वासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. या पुलाच्या बांधकामासाठी केंद्र शासनाकडून निधी आणला आहे. त्यामुळे या कामाचे श्रेय आ. रवि राणांनी घेण्याचा प्रश्नच नाही. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते रेल्वे पुलाचा शुभारंभ व बडनेरातील वॅगन दुरुस्ती कारखान्याची कोनशीला ठेवण्याचे प्रस्तावित होते व त्या दिशेने प्रयत्नही सुरू केले होते.
- आनंदराव अडसूळ, खासदार, अमरावती