विडा घ्या हो नारायणा ! पानशौकिनांचे गाव
By Admin | Updated: August 2, 2015 00:32 IST2015-08-02T00:32:54+5:302015-08-02T00:32:54+5:30
शहरात अंदाजे दोनशे पान टपऱ्या असून बेरोजगारांना दररोजची रोजी रोटी उपलब्ध करुन देणारा हा हक्काचा व्यवसाय आहे.

विडा घ्या हो नारायणा ! पानशौकिनांचे गाव
अंजनगाव सुर्जी : शहरात अंदाजे दोनशे पान टपऱ्या असून बेरोजगारांना दररोजची रोजी रोटी उपलब्ध करुन देणारा हा हक्काचा व्यवसाय आहे. अंजनगाव परिसरात पूर्वी संपन्न पानमळे होते व शेकडो एकरावर लागवड होती. सध्या पान मळ्यांची संख्या शंभर एकरांच्या आत झाली आहे. पण पानमळे कमी झाले तरी या गावात पान शौकिनांची संख्या कमी नाही. अवघ्या पाच रुपयात मनपसंद पान देणारे अंजनगावचे पानटपरी धारक आपआपल्या परीने ग्राहकांचे समाधान करतात.
यापूर्वी संपन्न पान मळ्यामुळे पानांची किंमतही स्वस्त होती. अवघ्या दहा पैशात पंचवीस वर्षांपूर्वी येथे पान खायला मिळत होते. काळाच्या ओघात महागाई वाढली तरीही इतर शहरांच्या तुलनेत स्वस्तात पान देण्याची परंपरा आजही कायम आहे. दोन रुपयांच्या साध्या पानापासून तर दहा रुपयांच्या मसाला पट्टी पान पर्यंत ग्राहकांच्या मागणीनुसार सजविलेले पान येथे उपलब्ध आहे. दोनशेवर बेरोजगारांना रोजगार मिळवून देणाऱ्या या व्यवसायात काही निवडक जागी एक्कावण्ण रुपयांचे मधुचंद्र पानसुध्दा मिळते. बदलत्या जीवनशैलीनुसार काही पानटपऱ्या ग्राहकांच्या सोयीनुसार त्यांना थंडपेयासह सर्व काही पुरवितात. पान स्वस्त असल्यामुळे नेहमीच्या प्रवासातील ग्राहकवर्ग येथे आवर्जून थांबतो. प्रामुख्याने प्रवासी वाहतूक व्यवसायाचे ग्राहक मोठ्या प्रमाणावर पानाचा आस्वाद घेतात. शहरातील रहिवाश्यांचीही पान शौकीन प्रतिमा या व्यवसायाला जिवंत ठेवला आहे.
शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या पान विक्रीच्या मंडईमुळे या भागाला पानअटाई या नावाने ओळखतात. पानांचे उत्पादन स्थानिक परिसरात रोडवले तरी इतर राज्यांतून दररोज पानांचे पेटारे या ठिकाणी येतात. खुल्या पानांच्या खरेदी- विक्रीचा हा सर्व व्यवसाय पानअटाई येथे बारी समाजातील महिला वर्ग सांभाळतात, हे या व्यवसायाचे वैशिष्ट्ये आहे. पान मळ्यांना स्थानिक भाषेत पानतांडे असे म्हणतात. शे-सव्वाशे पान वेलांचे वाफे असले तर त्याला कणंग म्हणतात. पानाच्या वेलीला नागवेली म्हणतात. नागवेलीचे पान दानवांच्या समुद्र मंथनातून बाहेर आले, अशी आख्यायिका आहे.