पोहरा-चिरोडीच्या समृध्द जंगलात सुखाने नांदतोय वाघ
By Admin | Updated: October 20, 2015 00:09 IST2015-10-20T00:09:59+5:302015-10-20T00:09:59+5:30
शहरालगतच्या पोहरा-चिरोडी वनक्षेत्रातील समृध्द जंगलात स्थलांतरित केलेला वाघ सुखाने नांदतोय.

पोहरा-चिरोडीच्या समृध्द जंगलात सुखाने नांदतोय वाघ
वैभव बाबरेकर अमरावती
शहरालगतच्या पोहरा-चिरोडी वनक्षेत्रातील समृध्द जंगलात स्थलांतरित केलेला वाघ सुखाने नांदतोय. मागील आठवड्यात पुन्हा वाघ कॅमेराबध्द झाल्यामुळे वन्यप्रेमींमध्ये आनंद व्यक्त होत आहे.
शहरापासून केवळ १५ किलोमीटर अंतरावरील दुर्लक्षित पोहरा-चिरोडी जंगल वनवैभवाने समृध्द आहे. बोर अभयारण्यातून स्थलांतरित वाघ अमरावती जिल्ह्यातील समृध्द जंगलात वावरत असल्याची पृष्टी वनविभागाने केली आहे. वडाळी वनपरिक्षेत्रातील पोहरा व चांदूररेल्वे वनपरिक्षेत्रातील चिरोडीच्या जंगलात वाघ वास्तव्यास असल्याचे ‘युथ फॉर नेचर कंझर्व्हेवेशन’ संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातून सिध्द झाले आहे. सद्यस्थितीत संस्थाध्यक्ष तसेच वन्यजीव अभ्यासक स्वप्निल सोनोने यांच्या नेतृत्वात संस्थेचे अन्य पदाधिकारी पोहरा-चिरोडी जंगलातील वाघांच्या हालचालींवर लक्ष केंद्रित करून आहेत. वनविभाग व संस्थेने संयुक्तरीत्या जगंलात ट्रॅप कॅमेरे लावले आले असून बरेचदा वाघ कॅमेराबध्दसुध्दा झाला आहे. मागील आठवड्यात पुन्हा वाघ कॅमेराबध्द झाला असून जिल्ह्यातील जंगल वाघांसाठी समृध्द असल्याचे सिध्द होत आहे. वाघासाठी अमरावती जिल्ह्यातील जंगलात पोषक वातावरण असून चितळ, नीलगाय व अन्य तृणभक्षी प्राणी हे वाघांचे खाद्य देखील मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. वाघांच्या संरक्षणासाठी वनविभाग कसोशीने प्रयत्नरत असून अनेकदा वनविभागाचे अधिकारी पोहरा-चिरोडीच्या जंगलाचा आढावासुध्दा घेत आहेत. वाघांचे संरक्षण व जंगल समृध्द बनविण्यात वनविभागाचा मोलाचा वाटा आहे. त्यामुळेच पोहरा व चिरोडी जंगलात आतापर्यंत मानवी संघर्ष उद्भवला नाही, ही समृध्द जंगलाची खरीखुरी पावती म्हणावी लागेल.
मागील आठवड्यात नोंद वन्यप्रेमींमध्ये व्यक्त होत आहे आनंद
पोहरा-चिरोडी वनक्षेत्रातील जंगल समृध्द असल्यामुळे वाघासाठी पोषक वातावरण आहे. अनेकदा वनकर्मचाऱ्यांना वाघाचे प्रत्यक्ष दर्शन झाले आहे. तसेच ‘कॅमरा ट्रॅप’ मध्येही वाघ आढळून आला आहे. जंगलात वनकर्मचाऱ्यांची गस्त वाढविण्यात आली आहे.
- निनू सोमराज,
उपवनसंरक्षक, वनविभाग.
वनविभागाने वेळोवेळी लक्ष देऊन जंगल समृध्द बनविण्यासाठी परिश्रम घेत आहेत. त्यामुळे वन्यप्राण्यांसाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. उत्कृष्ट मॉनिटरिंंग व चराईबंदीमुळे हे शक्य झाले आहे.
- अनंत गावंडे,
चांदूररेल्वे वनपरिक्षेत्र अधिकारी.
वायएनसीओ संस्थेने पोहरा-चिरोडी जंगलात वाघाचे वास्तव्य असल्याचे सिध्द केले. वाघासाठी पोषक वातावरण जंगलात मिळत असल्यामुळे जंगल समृध्द आहे. त्यामुळेच वाघासाठी खाद्य भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे. म्हणूनच येथे आजपर्यंत मानवी संघर्ष उद्भवला नाही.
- स्वप्निल सोनोने,
वन्यजीव अभ्यासक.