लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : आपल्या सहा महिन्यांच्या चिमुकलीच्या जन्माची बनावट कागदपत्रे बनवून तिला तिची आत्या व आतोईने जबरीने स्वतःकडे ठेवून घेतले. ५ मार्चपासून तिच्यावर नणंद-नंदोईचा बेकायदेशीर ताबा आहे, अशी तक्रार एका महिलेने स्थानिक राजापेठ पोलिसांत नोंदविली. या प्रकरणी पोलिसांनी शनिवारी नेर तालुक्यातील एका दाम्पत्याविरुद्ध बीएनएसमधील 'कायदेशीर पालकत्वातून अपहरण' या कलमांन्वये गुन्हा दाखल केला.
पूजा (नाव बदललेले) हिने नोंदविलेल्या तक्रारीनुसार, ती पती आणि दोन मुलांसह अमरावतीत राहते. जून २०२४ मध्ये तिला तिसऱ्यांदा गर्भधारणेची चाहूल लागली. १७ फेब्रुवारी रोजी एका खासगी रुग्णालयात तिने मुलीला जन्म दिला. त्यावेळी सोबत भाची, जाऊ, नणंद, नंदोईही होते. यानंतर, ती माहेरी गेली. मुलीच्या नामकरणानंतर पुन्हा सासरी परतली. या दरम्यान, तेथेच असलेल्या नणंदेने आम्हाला मुलगी झाल्याचे गावकऱ्यांना खोटे सांगितले असल्याने, तुझी मुलगी आठ दिवसांसाठी गावी घेऊन जाऊ दे, अन्यथा आम्हाला मरायची वेळ येईल, अशी विनवणी पूजाकडे केली. पूजाने होकार दिल्यानंतर नणंद-नंदोई त्या चिमुकलीला घेऊन गेले.
पूजाचा नंबर केला ब्लॉक
- आठ दिवसांनंतर पूजाने मुलीला परत घेण्यासाठी कॉल केला, पण नणंद-नंदोईने तो कट केला. एवढेच नव्हे, तर नंबर ब्लॉकही केला. या दरम्यान दोन-तीन महिने उलटून गेले. पोलिसांत तक्रार करण्यासाठी निघालेल्या पूजाच्या पतीला सासूने 'बाळ तिकडेच राहू द्या, नाहीतर ते काहीतरी वाईट करून घेतील,' असे म्हणत थांबविले.
- जूनअखेरीस पूजाने पतीसह नणंदेचे घर गाठले. तेथे वादावादीनंतर नंदोईने मुलगी आणून देण्याचा शब्द दिला. मात्र, दुसऱ्याच दिवशी 'तुला जे करायचे ते कर, मी मुलगी परत देणार नाही,' अशी धमकी दिल्याचे पूजाने म्हटले आहे.
बनविले बनावट जन्म प्रमाणपत्र आणि आधारकार्डनेर पोलिसांकडून २३ जून रोजी पूजाच्या पतीला त्यांच्याविरुद्ध नणंदेने तक्रार नोंदविल्याचा कॉल आला. पूजा आणि तिच्या पतीने नेर पोलिस ठाणे गाठले, तेव्हा तेथे दाखल कागदपत्रांमध्ये पूजाला आपल्या मुलीच्या नावासमोर आई-वडील म्हणून नणंद-नंदोईचे नाव दिसून आले.मुलीचे जन्म प्रमाणपत्र, आधार कार्ड एवढेच नव्हे, तर डिस्चार्ज कार्डवरही नणंद-नंदोईचे नाव होते. डिस्चार्ज कार्ड नणंद-नंदोईने स्वतःच्या नावे बनविले व त्याआधारे मुलीचे आधार कार्ड आणि जन्म प्रमाणपत्र बनविल्याचे पूजा यांचे लक्षात आले.