ज्येष्ठता यादीतून नाव वगळले, कर्मचाऱ्याचे बांधकाम विभागासमोर आमरण उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:13 IST2021-07-27T04:13:54+5:302021-07-27T04:13:54+5:30
अमरावती : सार्वजनिक बांधकाम मंडळ, अकोला येथील अधीक्षक अभियंत्यांनी ज्येष्ठता यादीतून परस्पर वगळून कनिष्ठ सहकारी कर्मचाऱ्यास पदोन्नती देऊन ...

ज्येष्ठता यादीतून नाव वगळले, कर्मचाऱ्याचे बांधकाम विभागासमोर आमरण उपोषण
अमरावती : सार्वजनिक बांधकाम मंडळ, अकोला येथील अधीक्षक अभियंत्यांनी ज्येष्ठता यादीतून परस्पर वगळून कनिष्ठ सहकारी कर्मचाऱ्यास पदोन्नती देऊन केलेल्या अन्यायाविरोधात अंजनगावसुर्जी येथील कनिष्ठ लिपिक अमोल शेळके यांनी अमरावती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर सोमवारपासून बेमुदत उपोषण छेडले आहे. सन २०१२-१३ च्या ज्येष्ठता यादीतून परस्पर नाव गहाळ करून कनिष्ठ कर्मचाऱ्यास पदोन्नती दिल्याचा आरोप निवेदनातून शेळके यांनी केला आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागातील कर्मचारी अमोल शेळके सन २०१२-१३ मध्ये अधीक्षक अभियंता कार्यालयात कार्यरत असताना कर्मचारी एस.एस. राऊत हे सेवेमध्ये सहा महिने कनिष्ठ आहेत. सन २०१३ पासून सतत झालेल्या अन्यायाविरोधात पत्रव्यवहार व संबंधित अधिकाऱ्यांशी वारंवार चर्चा करूनदेखील त्यांनी कानावर हात ठेवले आहे. यापूर्वीसुद्धा २१ डिसेंबर २०२० रोजी बेमुदत उपोषण करण्यात आल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. मात्र, लेखी खोटे आश्वासन मिळाले, पण न्याय मिळाला नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. संबंधित अधिकाऱ्यांच्या मनमानी धोरणामुळे सदर कर्मचाऱ्यास आठ वर्षांपासून मानसिक त्रास होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. मात्र, उपोषणस्थळी अद्याप तरी कुणीही भेट दिली नाही.
-----------------------