कापूस चढतोय व्यापाऱ्यांच्या नावे
By Admin | Updated: February 8, 2015 23:26 IST2015-02-08T23:26:02+5:302015-02-08T23:26:02+5:30
खरिपाचे सोयाबीन उदध्वस्त झाल्यावर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मदार कपाशीवर होती. मात्र, यंदा कापसाचा हमीभाव वाढलाच नाही. आंतरराष्ट्रीय मागणी घटल्याचे कारण दर्शवित खासगी

कापूस चढतोय व्यापाऱ्यांच्या नावे
खरेदी केंद्रावर हमी भावाने विक्री : शेतकऱ्यांकडून मात्र कमी दराने खरेदी
गजानन मोहोड - अमरावती
खरिपाचे सोयाबीन उदध्वस्त झाल्यावर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मदार कपाशीवर होती. मात्र, यंदा कापसाचा हमीभाव वाढलाच नाही. आंतरराष्ट्रीय मागणी घटल्याचे कारण दर्शवित खासगी व्यापाऱ्यांनी हमीभावापेक्षाही ५०० रुपये कमीने कापसाची खरेदी केली. दोन लाख क्विंटलपेक्षा अधिक कापूस व्यापाऱ्यांनी खरेदी केला आहे. शासनाच्या हमीभाव खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांच्या ऐवजी व्यापाऱ्यांच्या नातेवाईकांच्या नावाने कापसाची खरेदी सुरू आहे.
जिल्ह्यात खरीप २०१४ च्या हंगामात १ लाख ९४ हजार ३५२ हेक्टर क्षेत्रात कपाशीचे पीक आहे. यंदा कापसाचे उत्पन्न मोठ्या प्रमाणावर घटले. तरीही सरासरी हेक्टरी ८ ते १० क्विंटल कापसाचे उत्पन्न अपेक्षित आहे. कपाशीच्या एकरी २० ते २५ हजारांचा उत्पादन खर्च होत असताना उत्पादन मात्र निम्मेही होत नसल्याची वस्तूस्थिती आहे.
कापूस निघायला सुरुवात झाल्यानंतर कापसाचे भाव पाडण्यात आले. ४ हजार ५० रुपये कापसाचा आधारभूत हमीभाव असताना ३५०० ते ३७०० रुपयांपर्यंत कापसाची प्रतिक्विंटलने स्थानिक खरेदी व्यापाऱ्यांनी केली. सध्या कापसाची ३५०० ते ३६०० रुपयांनी कापसाची मागणी व्यापारी करीत आहेत. जिल्ह्यात सध्या कॉटन फेडरेशन, नाफेड व सीसीआयचे ११ खरेदी केंद्र सुरु आहेत. आधारभूत दराने कापूस खरेदी सुरू आहे. या केंद्रांवर रोख चुकारा केला जात नाही. त्यामुळे आर्थिक अडचणीत असलेला शेतकरी व्यापाऱ्याच्या जाळ्यात अडकतो आहे. खासगी व्यापारी शासन हमी दराच्या ४०० ते ५०० रुपये कमीने कापसाची खरेदी करीत आहे. हाच कापूस व्यापारी नातेवाईकांच्या नावे शासनाच्या खरेदी केंद्रात नातेवाईकांच्या नावे कापूस दाखवून हमीभावाने विक्री करीत आहे.