आमदाराच्या कृत्याने नाव कलंकित

By Admin | Updated: June 29, 2015 00:38 IST2015-06-29T00:38:32+5:302015-06-29T00:38:32+5:30

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळात ३८५ कोटी रुपयांचा घोटाळा हा राष्ट्रवादीचे विद्यमान आ. रमेश कदम यांनी केला आहे.

Name blamed by MLA's action | आमदाराच्या कृत्याने नाव कलंकित

आमदाराच्या कृत्याने नाव कलंकित

साठे महामंडळातील घोटाळा : लक्ष्मणराव ढोबळे यांचा पत्रपरिषदेत आरोप
अमरावती : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळात ३८५ कोटी रुपयांचा घोटाळा हा राष्ट्रवादीचे विद्यमान आ. रमेश कदम यांनी केला आहे. परंतु या महामंडळात घोटाळा झाल्याप्रकरणी अनेक योजना, प्रकल्पांना निधी देण्याचे शासनाने थांबविले आहे. घोटाळ्यामुळे अण्णाभाऊंचे नाव कलंकित झाले आहे. ही बाब संपूर्ण समाजासाठी अन्यायकारक आहे. त्यामुळे आमदाराच्या पापाचे खापर समाजावर न फोडता १ आॅगस्टपासून योजनांना निधी उपलब्ध करुन दिला नाही तर राज्यभर आंदोलन केले जाईल, असा गर्भीत इशारा राज्याचे माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी रविवारी येथे दिला.
ढोबळे हे विदर्भाच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी येथील शासकीय विश्रामभवनात पत्रपरिषद घेऊन अण्णाभाऊ साठे महामंडळात झालेल्या घोटाळ्याची मालिकाच वाचली. साठे महामंडळाचे ३० वर्षे उत्तम कामकाज सुरु असताना सन- २०१४ या एकाच वर्षात आ. रमेश कदम यांनी ३८५ कोटी रुपयांचा घोटाळा केल्यानंतरही अटक केली जात नसल्याने आश्चर्य व्यक्त केले. आ. कदम हे आघाडी शासनाच्या काळात या महामंडळाचे अध्यक्ष होते. कदम अध्यक्ष असलेल्या तीन संस्थांना त्यांनी महामंडळाच्या तिजोरीतून १४२ कोटी रुपयांचे नियमबाह्य वाटप केले, असा आरोप ढोबळे यांनी केला. महामंडळातील घोटाळ्याची चौकशी सीआयडीमार्फत सुरु असली तरी या चौकशीला फारसा वेग आलेला नाही. आ. कदम यांनी कोट्यवधींचा घोटाळा केल्याचे चौकशीत समोर आले असताना घोटाळेबाज अद्यापही मोकळेच आहेत. सीआयडीने अमरावती, नाशिक, पश्चिम महाराष्ट्र व औरंगाबाद विभागात चौकशीसाठी चार चमुंची नियुक्ती केली आहे. ही चौकशी होऊन दोषींवर कारवाई झालीच पाहिजे. परंतु ज्या समाजाला या महामंडळाकडून उत्थानाच्या अपेक्षा आहेत त्या अण्णाभाऊ साठे महामंडळात पूर्ववतपणे योजना, प्रशिक्षण, शिष्यवृत्ती, रोजगाराचे दालन, कर्जवाटप, मातंग महिला समृद्धी योजना सुरु करण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीदिनी १ आॅगस्टपासून महामंडळात योजना सुरु करण्यात आल्या नाही तर समाज रस्त्यावर उतरेल, असे लक्ष्मणराव ढोबळे म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसपासून फारकत घेतलेले ढोबळे हे भाजपच्या वाटेवर असल्याचा प्रश्न विचारताच जो पक्ष समाजाच्या हिताचे काम करेल त्याची साथ घेऊ. कोणताही राजकीय पक्ष वर्ज्य नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
पत्रपरिषदेला उत्तमराव भैसने, बबनराव शिर्के, गणेशदास गायकवाड, सुरेश स्वर्गे, एस. एम.गवई, अजय डोंगरे, दिलीप जोगदंड आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Name blamed by MLA's action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.