दिवाळीपूर्वीच फुटणार नगरपंचायतींचे फटाके
By Admin | Updated: September 30, 2015 00:29 IST2015-09-30T00:29:14+5:302015-09-30T00:29:14+5:30
जिल्ह्यातील तिवसा, भातकुली, नांदगाव व धारणी या नवनिर्मित नगरपंचायतींची निवडणूक जाहीर होताच राजकीय हालचालींना वेग आला आहे.

दिवाळीपूर्वीच फुटणार नगरपंचायतींचे फटाके
राजकीय हालचालींना वेग : नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची प्रतीक्षा
अमरावती : जिल्ह्यातील तिवसा, भातकुली, नांदगाव व धारणी या नवनिर्मित नगरपंचायतींची निवडणूक जाहीर होताच राजकीय हालचालींना वेग आला आहे. प्रभागांचे आरक्षण जाहीर झाले असले तरी नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची प्रतीक्षा करावी लागत आहे. नगरपंचायत निवडणुकीमुळे यंदा मात्र दिवाळीपूर्वीच फटाके फुटणार आहेत.
जिल्ह्यात ४ तालुक्यांच्या मुख्यालयी ग्रामपंचायतीऐवजी नगरपंचायत स्थापनेचा निर्णय गतवर्षी आघाडी सरकारने घेतला होता. परंतु जिल्ह्यात या निर्णयाची अंमलबजावणी युती सरकारच्या काळात झाली. ९ एप्रिल रोजी नगरपंचायतींची अधिसूचना जारी होऊन ग्रामपंचायती बरखास्त झाल्यात. संबंधित तालुक्याच्या तहसीलदारांची प्रशासकपदी नियुक्ती करण्यात आली. प्रशासकांनी सहा महिन्यांच्या आत निवडणूक प्रक्रियेची तयारी करावी, असे निर्देश नगरविकास विभागाने दिले होते. त्या अन्वये आॅगस्ट महिन्यात प्रभागरचना व आरक्षणाची प्रक्रिया पार पडली. साधारणपणे ५०० मतदारसंख्येचा एक प्रभाग असे १७ प्रभाग प्रत्येक नगरपंचायतीमध्ये जाहीर करण्यात आले. तेव्हापासूनच येथे राजकीय हालचालींनी वेग घेतला होता. प्रभाग आरक्षणनिहाय उमेदवारांचा शोध घेणे, राखीव प्रभागातील उमेदवारांचे जात, वैधताप्रमाणपत्र काढणे या सोपस्कारांना गेल्या महिन्यापासून गती मिळाली आहे. नगरपंचायती स्थापित झाल्यापासून प्रामुख्याने युवा उमेदवार बाशिंग बांधून आहेत. अपक्षांनीही जोरदार तयारी सुरू केली आहे. प्रथमच निवडणूक होणारी नगरपंचायत ताब्यात घेण्यासाठी सर्वच पक्ष पुढे सरसावले आहेत. (प्रतिनिधी)
आरक्षण गुलदस्त्यात
नगरपंचायतींमध्ये १७ प्रभाग आहेत. या प्रभागांची आरक्षण प्रक्रिया मागील महिन्यात पार पडली. त्या अनुषंगाने राजकीय पक्षांद्वारा उमेदवारांचा शोध घेतला जात आहे. मात्र, नगराध्यक्षपदाचे आरक्षण अद्याप गुलदस्त्यात असल्याने इच्छुक उमेदवारांना मात्र प्रतीक्षा करावी लागत आहे.
संकेतस्थळावरील अर्जाने उडणार तारांबळ
महाआॅनलाईनद्वारे विकसित केलेल्या संकेतस्थळावर उमेदवारी अर्ज व शपथपत्रे सादर करावी लागणार आहेत. ग्रामीण भागात बीएसएनएल सेवेचा बोजवारा जगजाहीर असल्याने उमेदवारांची तारांबळ उडण्याची शक्यता आहे. दोन महिन्यांपूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवारांना या ‘सर्व्हर डाऊन’चा फटका बसला होता. अखेर आयोगाने पारंपरिक पद्धतीने अर्ज स्वीकारले होते.
नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाविषयी अद्याप कुठल्याही सूचना नाहीत. निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. निवडणुकी पश्चात आरक्षण जाहीर होण्याची शक्यता आहे.
- विजय लोखंडे,
प्रशासक, तिवसा नगरपंचायत.