नाफेडच्या तूर खरेदीसाठी सहा केंद्र निश्चित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:14 IST2021-01-20T04:14:17+5:302021-01-20T04:14:17+5:30
पणन विभागाचे आवाहन अमरावती : केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत योजने अंतर्गत नाफेडच्या वतीने यंदा तूर नोंदणी ऑनलाईन पद्धतीने ...

नाफेडच्या तूर खरेदीसाठी सहा केंद्र निश्चित
पणन विभागाचे आवाहन
अमरावती : केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत योजने अंतर्गत नाफेडच्या वतीने यंदा तूर नोंदणी ऑनलाईन पद्धतीने २८ डिसेंबरपासून सुरू करण्यात आली आहे. तूर नोंदणीसाठी जिल्ह्यात सहा खरेदी केंद्र निश्चित करण्यात आली असून शेतकऱ्यांनी तालुक्याच्या केंद्राच्या ठिकाणी संपर्क साधून तुरीची नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा पणन अधिकाऱ्यांनी केले आहे.
शेतकरी बांधवांनी तूर नोंदणीकरिता यंदाच्या खरीप हंगामातील पीकपेरा नोंद असलेला तलाठ्याचा सहीशिक्क्यानिशी ऑनलाईन सातबारा, आधारकार्डची छायांकित प्रत, बँक पासबुक प्रत खरेदी केंद्रावर सोबत आणणे आवश्यक आहे. बँक पासबुकवर शेतकऱ्यांचे नाव, खाते क्रमांक, आयएफसी कोड स्पष्ट नमूद असावा तसेच जनधन खाते किंवा पतसंस्थेतील खाते क्रमांक सादर करू नये, अशा सूचना विभागाने दिल्या आहे.
तालुकानिहाय तूर खरेदी केंद्रांमध्ये अचलपूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी मधुकरराव टवलारकर व्यापारी संकुल, सिव्हिल लाईन, परतवाडा तालुका खरेदी विक्री संघ, अचलपूर येथे नोंदणी करावी. चांदूर रेल्वे तालुक्याच्या शेतकऱ्यांनी स्टेट बँकेसमोर, धनराज नगर तालुका खरेदी-विक्री संघ, चांदूर रेल्वे येथे नोंदणी करता येईल व दर्यापूर तालुक्यात आकोट रोड, तालुका खरेदी-विक्री संघ, दर्यापूर येथे नोंदणी सुरू आहे. धारणी तालुक्यात सहकार भवन तालुका खरेदी-विक्री संघ, धारणी येथे नोंदणी सुरू आहे. नांदगाव खंडेश्वर तालुक्यात डॉ. इंगळे यांच्या दवाखान्याजवळ, तालुका खरेदी विक्री संघ, येथे नोंदणी सुरू आहे. तिवसा तालुक्यात आझाद चौक, डॉ. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख, तालुका खरेदी विक्री संघ, येथे नोंदणी सुरू आहे.
संबंधित तालुक्यातील व तालुक्याला जोडलेल्या तूर खरेदी केंद्राच्या ठिकाणी तूर हमीभावाने खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांनी नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.