शिरीष चौधरींच्या वक्तव्यात गूढ

By Admin | Updated: September 11, 2016 00:06 IST2016-09-11T00:06:58+5:302016-09-11T00:06:58+5:30

नरबळीच्या उद्देशाने मुलांवर जीवघेणे वार करायचे. नरबळीचा डाव फसला...

Mystery in Shirish Chaudhary's statement | शिरीष चौधरींच्या वक्तव्यात गूढ

शिरीष चौधरींच्या वक्तव्यात गूढ

काही लपविले तर जात नाही ना?
उलगडण्यालायक बरेच काही : बाथरूम शब्दाभोवती संशयाचे वलय
अमरावती : नरबळीच्या उद्देशाने मुलांवर जीवघेणे वार करायचे. नरबळीचा डाव फसला तर प्रशासकीय यंत्रणेला खोटी माहिती पुरवून तसे दस्तावेज तयार करायचे. पुढे त्यांचा पुरावा म्हणून वापर करायचा, अशी ‘मोड्स अ‍ॅप्रेंडी’ तर आश्रमातून वापरली जात नाही ना, अशी शंका उपस्थित होते.
अजयचा चेहरा दगडाने ठेचल्यानंतर तो बाथरूममध्ये पाय घसरून पडला, अशी माहिती आश्रमातील मंडळींनी अंजनसिंगी प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ.राजीव पाटील यांना दिली होती. त्यानुसारच मी नोंद घेतली, असे डॉ.पाटील यांनी 'लोकमत'ला सांगितले. पुढे तोच शासकीय दस्तावेज पुरावा म्हणून आश्रम ट्रस्टचे कार्यकारी अध्यक्ष शिरीष चौधरी यांनी पत्रपरिषदेदरम्यान सादर केला. डॉक्टरांच्या नोंदीनुसारच, आश्रमाने त्याच्या आईला माहिती दिल्याची भूमिका शिरीष चौधरी यांनी मांडली होती; तथापि डॉ.पाटील यांच्यानुसार प्रकरण उलटे असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळेच हा निर्दोषत्त्वाचे पुरावे निर्माण करण्याचा तो नियोजित प्रयत्न तर नाही ना, याकडे तपास अधिकाऱ्यांना दुर्लक्ष करता येणार नाही.
स्वच्छतागृह आले कुठून ?
आश्रम ट्रस्टचे कार्यकारी अध्यक्ष शिरीष चौधरी यांनी डॉक्टरांच्या हवाल्याने आम्ही बोललो, अशी जी भूमिका घेतली त्यानुसार आणखी एक गूढ निर्माण होते. तात्पुरत्या इलाजाच्या रकाण्यात डॉक्टरांनी ‘अ‍ॅक्सिडेन्टल फॉल डाऊन’ अर्थात् अपघाताने कोसळल्याचा उल्लेख केला आहे. या उल्लेखात स्वच्छतागृह अर्थात् बाथरूम हा शब्द कुठेही नाही. मग सवाल हा उपस्थित होतो की, अजय बाथरूममध्ये पडला, असे त्याच्या आईला का सांगण्यात आले? निरोप देण्याऱ्यांनी बाथरूम हा शब्द आणला कुठून? अजय बाथरूममध्ये पाय घसरून पडला असेल तर- बाथरूममध्ये पडल्यावर तो शुद्धीवर होता की बेशुद्ध? शुद्धीवर असेल तर त्याच्या झोपण्याच्या ठिकाणापर्यंत तो स्वत: आला काय? येऊन तेथे तो पुन्हा गुपचूप झोपला काय? स्वत: आला असेल तर त्याला ते आठवत का नाही? अजय बाथरूममध्येच बेशुद्धावस्थेत पडलेला असेल तर पहिल्यांदा त्याला कुणी बघितले? बाथरूममधून त्याला आणले कुणी? आणल्यावर त्याला पुन्हा त्याच्या झोपण्याच्याच जागेवर ठेवले गेले काय? ठेवले असल्यास तसे करण्याचे कारण काय? अजयला पहिल्यांदा बघणाऱ्याने कुणाकुणाला माहिती दिली होती?
कार्यकारी अध्यक्ष या नात्याने शिरीष चौधरी यांना या सर्व प्रश्नांची उत्तरे पोलीस तपासादरम्यान विचारण्यात न आल्यास तपास अधिकारी श्रीनिवास घाडगे यांनी ती चौधरींना बेकायदारीत्या दिलेली मुभा ठरेल. डॉक्टरांना खोटी माहिती देऊन आश्रमातील मंडळींनी तसा पुरावा मुद्दामच निर्माण केला असेल तर तपास अधिकाऱ्याने त्या मुद्याचाही नरबळीशी संबंध तपासला जावा. काही लपविले तर जात नाही ना, याचा प्रामाणिक तपास अजय आणि प्रथमेशला न्याय देऊ शकेल.

Web Title: Mystery in Shirish Chaudhary's statement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.