किशोर मोकलकर लोकमत न्यूज नेटवर्कटाकरखेडा पूर्णा : सध्या जग विज्ञान युगाकडे वाटचाल करीत आहे. तंत्रज्ञानाच्या साथीने मानवाने सर्व गोष्टींवर मात करण्यात यश प्राप्त केले. मात्र, आजही रहस्यमय घटना घडत असल्याचे प्रकार ऐकायला येतात. अशीच एक रहस्यमय घटना टाकरखेडा पूर्णा येथील सध्या परिसरात चर्चेचा विषय बनला असून, एका घरातील कापड व प्लास्टिकच्या वस्तू अचानक पेट घेत असल्याचा प्रकार घडत असल्याने येथील कुटुंब दोन दिवसांपासून दहशतीत आहे.हाकेच्या अंतरावर असलेल्या टाकरखेडा पूर्णा येथील रामसेवक पातालबंसी यांचे टीन व कौलारू घर आहे. मंगळवारपासून रहस्यमयरीत्या घरातील विविध कापडी व प्लास्टिक साहित्याला अचानक आग लागत आहे. त्यामुळे घरातील सदस्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर कुटुंबाने हा प्रकार विद्युत पुरवठ्यातील दोषामुळे घडत असल्याचा संशय करीत महावितरणकडे तक्रार केली व वीजपुरवठा बंद करण्याचे सांगितले. सदर तक्रारीवरून कर्मचार्यांनी घराचा वीजपुरवठा बंद करून सर्व्हिस लाईन वायर व अर्थिंग तारसुद्धा वेगळा केला. परंतु, वीजपुरवठा बंद करूनसुद्धा आगीच्या घटना घडत असल्याचे कुटुंबातील सदस्यांनी सांगितले. घरातील कापड व प्लास्टिकसारख्या वस्तू पेट घेत असल्यामुळे कुटुंबातील सदस्यांनी प्लास्टिक व कापडसारख्या वस्तू घराबाहेर ठेवल्या आहेत. दोन दिवसांपासून घरात रहस्यमयरीत्या आग लागत असल्याने संपूर्ण कुटुंब दहशतीत दिवस काढत आहे. नागरिकांमध्ये विविध चर्चेला पेव फुटले आहे. सदर घटनेची माहिती आसेगाव पोलिसांनासुद्धा दिल्याचे पातालबंसी कुटुंबाने सांगितले.
अंधश्रद्धा निर्मूलन समिती करणार का सत्यशोधन?अंधश्रद्धा निर्मूलन समितीने याप्रकरणी तातडीने दखल घेणे आता गरजेचे झाले आहे. अचानक आग लागून घरातील वस्तू-वस्त्रे जळण्याच्या अनेक घटना अंधश्रद्धेवर आधारित असल्याची सत्यता अंधश्रद्धा निर्मूलन समितीने यापूर्वीही उघडकीस आणली आहे. या घटनेतही अंनिसने घटनास्थळी सत्यशोधन करून वस्तुस्थिती सर्वांसमोर उघड करावी, अशी अपेक्षा विज्ञानवादी लोकांनी व्यक्त केली आहे.
सदर कुटुंबाने घरात शॉर्ट सर्किटमुळे आग लागत असल्याचे सांगितले. परंतु, घटनास्थळाला भेट दिली असता, असा कुठलाही प्रकार निदर्शनास आला नाही. त्यांनी वीजपुरवठा खांबावरूनच बंद करण्यास सांगितले. त्यांच्या सांगण्यावरून वीजपुरवठा बंद करण्यात आला. परंतु, सदर प्रकार घडतच असल्याचे या कुटुंबाने सांगितले.- मयूर वसू, वरिष्ठ तंत्रज्ञ, महावितरण केंद्र, आसेगाव पूर्णा