जवाहर कुंडातून मायलेकी सुखरूप बचावल्या
By Admin | Updated: July 28, 2015 00:18 IST2015-07-28T00:18:58+5:302015-07-28T00:18:58+5:30
पर्यटनासाठी आलेल्या कुटुंबातील मायलेकी जवाहर कुंडात पडून वाहत जाणार होत्या.

जवाहर कुंडातून मायलेकी सुखरूप बचावल्या
श्यामकांत पाण्डेय धारणी
पर्यटनासाठी आलेल्या कुटुंबातील मायलेकी जवाहर कुंडात पडून वाहत जाणार होत्या. परंतु येथीलच एका युवकाने दाखविलेल्या धाडसाने या कुटुंबावरील हे प्राणघातक संकट टळले आणि बघ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
सेमाडोहनजीकच्या जवाहर कुंडाजवळ रविवारी सायंकाळी ही घटना घडली. अमरावती-बऱ्हाणपूर मार्गावर सेमाडोहपासून ४ कि.मी. अंतरावर सिपना नदी आहे. या नदीवर जवाहर कुंड म्हणून धबधबा आहे. धबधबा पाहण्याकरिता पावसाळ्यात पर्यटकांची गर्दी होते. मात्र, काळजी न घेतल्याने येथे पर्यटकांचे अपघातही वारंवार होतात.
रविवारी दुपारी ४ वाजताच्या च्या दरम्यान अकोला येथील दांपत्य लहान मुलीसह या ठिकाणी आले. इतक्यात मुलीचा तोल गेल्याने ती नदीत पडून वाहून जाऊ लागली. मुलीला वाचविण्याकरिता आईने देखील तिच्या पाठोपाठ उडी घेतली. सुदैवाने या दोघीही धबधब्याच्या आत कोसळण्यापूर्वी दगडावर अडकल्यात. घटनेची माहिती मिळताच सेमाडोह वन नाक्यावरील कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. झाडाला दोर बांधून सोगेलाल तुमला धिकार हा युवक पाण्यात उतरला व त्याने मायलेकींना सुखरूप बाहेर काढले.