रेल्वेस्थानकावर मुसाफिरांचा डेरा

By Admin | Updated: August 4, 2015 00:12 IST2015-08-04T00:12:51+5:302015-08-04T00:12:51+5:30

येथील रेल्वेस्थानकावर परप्रांतीय व महाराष्ट्रातील विविध ठिकाणच्या मुसाफिरांनी डेरा मांडला आहे.

Musafir's camp at the railway station | रेल्वेस्थानकावर मुसाफिरांचा डेरा

रेल्वेस्थानकावर मुसाफिरांचा डेरा

पोलिसांचे दुर्लक्ष : प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, मोठी हानी होण्याची शक्यता
बडनेरा : येथील रेल्वेस्थानकावर परप्रांतीय व महाराष्ट्रातील विविध ठिकाणच्या मुसाफिरांनी डेरा मांडला आहे. सर्वसामान्यांना रेल्वेचे नियम सांगणाऱ्या रेल्वे प्रशासन, रेल्वे पोलीस व रेल्वे सुरक्षा बलाचे या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे रेल्वेस्थानकाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
बडनेरा जंक्शन रेल्वेस्थानक सर्वदूरपर्यंत परिचित आहे. अलीकडे या रेल्वेस्थानकाहून भारतातल्या जवळपास भागांमध्ये जाण्याची सोय आहे. मुंबई, दिल्ली, कोलकाता, मद्रास या मुख्य शहरांना बडनेरा रेल्वेस्थानक जुळून आहे. विजय मिल असताना बडनेऱ्याला उद्योग नगरी म्हणून ओळख होती. तेव्हापासून बडनेरा रेल्वेस्थानकाला महत्त्व प्राप्त आहे. या रेल्वे स्थानकाचा कायापालटदेखील करण्यात आला आहे.
दर दिवसाला हजारोंच्या संख्येत प्रवासी येथून ये-जा करतात. मात्र बडनेरा रेल्वेस्थानकाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहे. रेल्वेस्थानकाच्या आत शिरण्यासाठी जुन्या बुकिंग कार्यालयाकडे स्कॅनर मशीन बसविण्यात आली आहे. रेल्वे स्थानकाची व रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ही मशीन बसविण्यात आली आहे.
मात्र नवीन बुकिंग कार्यालयाच्या बाजूने रेल्वेस्थानकाच्या परिसरात राजरोसपणे मुसाफीर रात्र-दिवस आपला डेरा मांडून आहेत. बुकिंग आॅफिससमोर रात्री मच्छरदाणी लावून हे मुसाफीर झोपतात. रेल्वे प्लॅटफॉर्मवरील पाण्याच्या स्टॅन्डचा आंघोळीसाठी वापर होत आहे. पेट्रोल, डिझेल टँक भरून असणाऱ्या मालगाड्यांच्या जवळच मुसाफीर स्वयंपाकाच्या चुली पेटवीत आहेत. बुकिंग आॅफिससमोरील हॉलमध्ये मुसाफीर झोपत असल्यामुळे रात्री-अपरात्री रेल्वेने ये-जा करणाऱ्या प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. एकीकडे रेल्वे प्रशासन रेल्वेस्थानक व रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी लाखो रूपयांचा खर्च करीत आहे. त्याचा बडनेरा रेल्वेस्थानकावर कुठलाच उपयोग होत नसल्याचे चित्र आहे. वरिष्ठांनी याची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी ओरड प्रवासी वर्गांमध्ये आहे.
बडनेरा रेल्वेस्थानकाला मुसाफिरांनी आपला अधिवासाचा अड्डा बनविलेला आहे. परप्रांतीय, फेरीवाले याच ठिकाणी डेरेदाखल होत आहेत. यांच्याकडे कुठलीही प्लॅटफॉर्म तिकीट राहत नसल्याचे अनेकदा उघडकीस आले आहे. राजरोसपणे हे रेल्वे ट्रॅक क्रॉसिंग करतात. केवळ सामान्य नागरिकांनाच रेल्वेच्या नियमांचा धाक दाखविला जातो.

त्यांच्यावर कारवाईदेखील केली जाते. मग अशा मुसाफिरांवर रेल्वे पोलीस व सुरक्षा बल का मेहेरबान, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. ज्वलनशील असणारी वस्तू रेल्वेस्थानक असो की प्रवासी गाड्यांमधून नेता येत नाही. त्यावर रेल्वे पोलिसांकडून कठोर कारवाई केल्या जाते, असे असताना मुसाफीर लोकांना का सवलत, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
पेट्रोल, डिझेल टँकरजवळच स्वयंपाक, शहराला धोका
मुसाफीर स्वयंपाकाच्या चुली प्लॅटफॉर्म जवळच पेटवीत आहे. अनेकदा त्या प्लॅट फॉर्मवर डिझेल किंवा पेट्रोलने भरलेल्या टँकरच्या मालगाड्यादेखील उभ्या असतात. एखादवेळेस या टँकरमध्ये लिकेज राहिल्यास बडनेरा रेल्वे स्थानकासह संपूर्ण बडनेरा शहराला मोठ्या प्रमाणात धोका निर्माण होऊ शकते. या बाबीची दखल रेल्वे प्रशासनाने घेणे गरजेचे आहे. पर्यायाने रेल्वे प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे मोठी दुर्घटना घडल्यास मोठे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Web Title: Musafir's camp at the railway station