मुरलीधर महाराजाने उतरविली साधूची खोळ
By Admin | Updated: January 12, 2017 00:09 IST2017-01-12T00:09:57+5:302017-01-12T00:09:57+5:30
चांदूरबाजार येथील न्यायालयात बयाण नोंदविण्याकरिता सोमवारी आधुनिक वेशभूषेत पोहोचलेल्या बहुचर्चित मुरलीधर महाराजांना पाहून नागरिकांचे डोळे आश्चर्याने विस्फारले गेले.

मुरलीधर महाराजाने उतरविली साधूची खोळ
आधुनिकअवतारात पोहोचले न्यायालयात : नागरिकांना आश्चर्याचा धक्का
अमरावती : चांदूरबाजार येथील न्यायालयात बयाण नोंदविण्याकरिता सोमवारी आधुनिक वेशभूषेत पोहोचलेल्या बहुचर्चित मुरलीधर महाराजांना पाहून नागरिकांचे डोळे आश्चर्याने विस्फारले गेले. एरवी भगवी कफनी आणि डोक्यावरील भगव्या फेटा अशा वेशभूषेत असणाऱ्या महाराजांना पाहून न्यायालय परिसरात उपस्थित बघ्यांची कुजबुज सुरू झाली होती. टी-शर्ट, गॉगल, फॉर्मल पँट अशा वेषातील महाराजांना तर अनेकांनी ओळखले देखील नाही.
येलकीपूर्णा मठातील मुरलीधर महाराजांच्या रासलीला प्रकरणी महाराजांच्या विरोधात शफीक राजाने आसेगाव पूर्णा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. त्यानंतर मुरलीधर महाराजांनीही शफीक राजाविरूद्ध तक्रार दिली. महाराजांच्या रासलीलेच्या ‘व्हिडीओ क्लिप’ व्हायरल झाल्यामुळे हेप्रकरण राज्यभरात चर्चिले गेले. मात्र, यातील पीडित महिलांनी याप्रकाराबाबत कोणताही आक्षेप न घेतल्याने व तसे बयाण पोलिसांना दिल्यानंतर याप्रकरणाला वेगळे वळण मिळाले. महिलांची महाराजाविरूद्ध तक्रार नसल्याने पोलिसांसमोरही कारवाईचा पेच निर्माण झाला आहे. दरम्यान अश्लिल चित्रफित व्हायरल करून बदनामी केल्याचा आरोप करीत क्लिपमधील एका महिलेने शफीक राजाविरुद्ध आसेगाव पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी शफीक राजाविरुद्ध गुन्हा देखील नोंदविला. मुरलीधर महाराजावर पोलिसांनी कारवाई न केल्यामुळे शफीक राजा यांनी चांदूरबाजार न्यायालयात अर्ज केला.
आसाराम बापूविरूद्धच्या खटल्याचा हवाला
अमरावती : न्यायालयाने सोमवारी सुनावणीची तारीख दिली होेती. तत्पूर्वी शफीक राजाविरोधात महिलांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने ९ जानेवारी रोजी मुरलीधर महाराज आलिशान कारमधून आधुनिक पेहेरावात न्यायालयात पोहोचले. उपस्थितांनी त्यांना ओळखले नाही. मात्र, न्यायालयात त्यांच्या नावाचा पुकारा झाल्यानंतर महाराजांचे बदलेले रूप पाहून अनेकांना झटका बसला. पश्चात तीन तास महाराजांचे बयाण न्यायालयात नोंदविले गेले. मंगळवारी शफीक राजा यांचे वकील कुंदन पडोळे यांनी चांदूरबाजार न्यायालयाचे न्यायाधीश बी.ए.गुलाटी यांच्यासमोर बाजू मांडली. त्यांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा हवाला दिला. हरियाणा येथील सत्पालसिंहविरुद्ध हरियाणा सरकार असा तो खटला होता. त्यानिर्णयाच्या आधारे आसाराम बापू यांचा जामीन रद्द करण्यात आला होता.