लोकमत न्यूज नेटवर्कधामणगाव रेल्वे : अनैतिक संबंधाच्या कारणावरून पतीने पत्नीची धारदार शस्त्राने हत्या केल्याची घटना जुना धामणगाव परिसरातील वीटभट्टीवर मंगळवारी दुपारी घडली. सविता दिनेश खेडकर असे मृताचे नाव आहे, तर आरोपी पतीला अटक करण्यात आली आहे. तालुक्यातील अंजनसिंगी वाॅर्ड नंबर ४ येथील हातमजुरी करणाऱ्या दिनेश सुधाकर खेडकर याचे आठ वर्षांपूर्वी वडरपुरा अमरावती येथील सविता या युवतीशी लग्न झाले. दोन वर्षांपूर्वी रोजगाराच्या निमित्ताने दिनेश पत्नीसह वडरपुरा अमरावती येथे सासूरवाडीला राहू लागला. दरम्यान, जानेवारी महिन्यात सविता आपल्या एका लहान मुलाला सोबत घेऊन कोणाला काहीही न सांगता तेथून निघून गेली होती. सविता जुना धामणगाव येथील एका व्यक्तीच्या घरी राहत असल्याची माहिती दिनेशला मिळाली. त्याने अंजनसिंगी येथील आपल्या आईवडिलांना सांगून सविताच्या अशोकनगर येथील एका नातेवाईकास घेऊन तिची समजूत काढली. मात्र सविताने घरी परतण्यास नकार दिला. जुना धामणगाव येथील संबंधित व्यक्तीनेसुद्धा कुटुंबात वाद नको म्हणून सविताला जवळच्याच दाभाडे रस्त्यावरील गजानन गोठाणे यांच्या वीटभट्टीवर नेऊन ठेवले. ही माहिती दिनेशला कळताच त्याने ८ मार्च रोजी दुपारी १ च्या सुमारास वीटभट्टी गाठून शस्त्राने सवितावर सपासप वार करून तिला जागीच ठार केले. दत्तापूरचे ठाणेदार राजेश राठोड यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळ गाठले.