संपत्तीच्या वादातून थोरल्या भावाची हत्या
By Admin | Updated: September 12, 2016 00:08 IST2016-09-12T00:08:13+5:302016-09-12T00:08:13+5:30
संपत्तीच्या वादातून धाकट्या भावाने थोरल्या भावावर धारदार शस्त्राने वार करून त्याची हत्या केली.

संपत्तीच्या वादातून थोरल्या भावाची हत्या
आरोपी अटकेत : डेहणी येथील घटना
तिवसा : संपत्तीच्या वादातून धाकट्या भावाने थोरल्या भावावर धारदार शस्त्राने वार करून त्याची हत्या केली. ही घटना तिवसा पोलीस ठाण्यांतर्गत डेहणी येथे रविवारी दुपारी उघडकीस आली. संजय अजाब मेटांगे (४०, रा. डेहणी) असे मृताचे नाव असून विजय अजाब मेटांगे (३५, रा. डेहणी) असे आरोपीचे नाव आहे. आरोपीला लगेचच अटक करण्यात आली. भावकीतून ही हत्या घडून आल्याने छोट्याशा डेहणी गावात मोठी खळबळ उडाली.
उपरोक्त दोन्ही भावांमध्ये संपत्तीवरून वाद सुरू होता. वारंवार भांडणे होत होती. याच वादातून धाकट्या विजय अजाब मेटांगेने शनिवारी मध्यरात्री दरम्यान थोरला भाऊ संजय मेटांगे याच्या घरात शिरून निद्रावस्थेतच धारदार शस्त्राने वार केले. याच त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. रविवारी दुपारी २ वाजेपर्यंत संजयच्या घराचे दार न उघडल्याने हा प्रकार उघडकीस आला.
पोलीस पाटील उमेश मनोहर राऊत यांच्या तक्रारीवरून तिवसा पोलिसांनी आरोपी विजय मेंटागे याला अटक केली. घटनेचा तपास करण्यासाठी ठाणेदार दिनेश शेळके, पीएसआय शिंदे, प्रवीण जनबंधू, देशमुख आदींनी घटनास्थळावर जाऊन पंचनामा केला.
आरोपीविरुद्ध भादंविच्या कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. (शहर प्रतिनिधी)