आॅनलाईन नामांकनासाठी महापालिका हेल्पफुल !

By Admin | Updated: January 13, 2017 00:04 IST2017-01-13T00:04:26+5:302017-01-13T00:04:26+5:30

महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत संगणकीय प्रणालीद्वारे नामनिर्देशनपत्रे व शपथपत्रे दाखल करण्याची सुविधा आयोगाने उपलब्ध करून दिली आहे.

Municipality Helpful for online enrollment! | आॅनलाईन नामांकनासाठी महापालिका हेल्पफुल !

आॅनलाईन नामांकनासाठी महापालिका हेल्पफुल !

मदत कक्षाची उभारणी : ‘एआरओं’कडे जबाबदारी
अमरावती : महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत संगणकीय प्रणालीद्वारे नामनिर्देशनपत्रे व शपथपत्रे दाखल करण्याची सुविधा आयोगाने उपलब्ध करून दिली आहे. यासाठी महापालिका स्तरावर एक किंवा त्यापेक्षा अधिक मदतकक्ष स्थापन करण्यात येणार आहे. आयुक्त हेमंत पवार यांनीही जबाबदारी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी क्र. ३ वर सोपविली आहे. याशिवाय सातही झोनमधील ‘रिटर्निंग आॅफिसर’ आॅनलाईन उमेदवारी अर्ज भरून देण्यास मदत करतील.
यासाठी सायबर कॅफे व कम्युनिटी फॅसिलिटेशन सेंटरची मदत घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. उमेदवारांना शपथपत्रे स्टॅम्प पेपरवर सादर करण्याची गरज नाही. नामांकन संगणक प्रणालीद्वारे भरण्याची सुविधा उपलब्ध असली तरी अर्ज मागे घेण्यासाठी संगणक प्रक्रियेची गरज नाही. याशिवाय उमेदवारी अर्जासोबत जातप्रमाणपत्र व जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. परंतु जातवैधता प्रमाणपत्र नसल्यास जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे अर्ज केल्याची पावती किंवा अन्य पुरावा देण्याची मुभा देण्यात आली आहे. संबंधित उमेदवारांनी सहा महिन्याच्या आत जातवैधता प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे, असे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)

तीन पथक कार्यान्वित
निवडणूक निर्णय अधिकारी हेमंत पवार यांनी गुरुवारी व्हिडिओग्राफी सर्व्हायलंस पथक, भरारी पथक आणि चेकपोस्ट पथक कार्यान्वित केले. हे पथक सभा, बैठकी, मेळावे, पैसा, मद्यवाहतूक, मिरवणूक, आचारसंहिता अंमलबजावणीची देखरेख करतील. यातीनही पथकांवर स्वतंत्र जबाबदारी दिली आहे. भरारी पथकामध्ये महापालिका अधिकाऱ्यांसह पोलीस, आरटीओ आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचा एक-एक प्रतिनिधी असेल. याशिवाय आचारसंहिता उल्लंघन व अन्य तक्रारींचे निवारण करण्यासाठी ‘कंट्रोल रुम’ स्थापित करण्यात येणार आहे.

Web Title: Municipality Helpful for online enrollment!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.