महापालिका यंत्रणा थंड; उपायुक्तांचा उद्वेग !
By Admin | Updated: June 3, 2016 00:18 IST2016-06-03T00:18:21+5:302016-06-03T00:18:21+5:30
आयुक्त रजेवर गेल्याने व प्रभारी आयुक्त फिरकत नसल्याने महापालिकेची यंत्रणा ‘थंडावली’ आहे. कर्मचारी, ...

महापालिका यंत्रणा थंड; उपायुक्तांचा उद्वेग !
अमरावती : आयुक्त रजेवर गेल्याने व प्रभारी आयुक्त फिरकत नसल्याने महापालिकेची यंत्रणा ‘थंडावली’ आहे. कर्मचारी, अधिकाऱ्यांवर फारसा वचक नसल्याने कर्मचारीच ‘राजे’ झाले आहेत. त्याचा प्रत्यय गुरूवारी उपायुक्त विनायक औगड यांना आला. कर्मचाऱ्यांमधील ‘साचलेपणा’ औगडांनी अनुभवला. कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांच्याही वेळकाढू वृत्तीवर औगड यांनी उद्वेग व्यक्त केला.
गुरूवारी सायंकाळी ५ वाजतानंतर उपायुक्त विनायक औगड हे अधिनस्थांसह महापालिकेतील कार्यकारी अभियंता (१)कार्यालयात पोहोचले. त्यांनी लेखाविभागाचा धांडोळा घेतला असता १० पेक्षा अधिक कर्मचारी गैरहजर आढळून आले. सोमवारपासून औगड विविध विभागातील कर्मचारी- अधिकाऱ्यांचा आढावा घेत आहेत. आयुक्त हेमंत पवार रजेवर गेल्याने आयुक्तपदाचा पदभार जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्याकडे आहे. मात्र, ते आतापर्यंत पालिकेत फिरकले नाहीत. त्यामुळे हटकणारे कोणीच नाही म्हणनू अनेक विभागातील बहुतांश कर्मचारी वेळेवर कार्यालयात येत नाहीत. मात्र, परत जाताना लवकर जातात. विनापरवानगी गैरहजर राहतात, अशा तक्रारी उपायुक्तांकडे आल्या होत्या. त्याची शहानिशा करण्यासाठी औगड गुरूवारी स्वत:च कार्यालयाचा धांडोळा घेण्यास निघाले. सोमवारपासून सुरू असलेली ही पाहणी शनिवारपर्यंत चालणार आहे. त्यानंतर विनापरवानगी सुट्या घेणारे, कार्यालयाला बुट्टी मारणारे, लवकर घरी परतणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या निश्चित झाल्यानंतर त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. रमाई आवास योजनेच्या कार्यालयाशेजारी उपायुक्तांना अस्वच्छता आढळून आली. त्यावरही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांप्रती नाराजी दर्शविली. कर विभाग, एलबीटी, महिला व बालकल्याण विभागासह पाणीपुरवठा व अन्य काही विभाग कार्यालयांची औगड यांनी झाडाझडती घेतली. या झाडाझडतीदरम्यान यंत्रणेतील अनेक दोष त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी रोष व्यक्त केला.