महापालिकेचा ९२५.९३ कोटींचा अर्थसंकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:14 IST2021-03-23T04:14:36+5:302021-03-23T04:14:36+5:30
अमरावती : महापालिकेच्या सन २०२१-२२ या आर्थिक वर्षाकरिता स्थायी समितीचे सभापती शिरीष रासने यांनी ३१.१९ कोटींचा शिल्लक असलेला एकूण ...

महापालिकेचा ९२५.९३ कोटींचा अर्थसंकल्प
अमरावती : महापालिकेच्या सन २०२१-२२ या आर्थिक वर्षाकरिता स्थायी समितीचे सभापती शिरीष रासने यांनी ३१.१९ कोटींचा शिल्लक असलेला एकूण ९२५.९३ कोटींचा अर्थसंकल्प आमसभेत सादर केला. यात ४४३.०२ कोटी महसुली व ४५९.६५ कोटी भांडवली उत्पन्न दर्शविण्यात आले आहे. आठ महिन्यांवर निवडणुका असल्यामुळे २५ लाखांचा वाॅर्ड विकास व २५ लाखांचा स्वेच्छा निधी एकमुस्त मिळावा, यासाठी सभागृहात चांगलेच घमासान झाले.
महापालिकेच्या विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात आयोजित अर्थसंकल्पीय विशेष सभेत स्थायी समितीने सुधारणा व तरतुदी सुचविल्या होत्या. त्यानुसार आयुक्तांच्या बजेटमध्ये आवश्यक त्या सुधारणा करून ९२५.९४ कोटींचा अर्थसंकल्प सादर केला. प्रशासनाने सुरुवातीची शिल्लक ५८.९२ कोटी, आणि महसुली उत्पन्न ३६०.२५ कोटी,असे एकूण ४१९.१७ कोटी उत्पन्नाचे व एकूण महसुली खर्च ३७३.१६ कोटी नमूद करून ४६ कोटी शिलकीचे अंदाजपत्रक सादर केले होते. त्यात २३.८५ कोटींची वाढ स्थायी समितीने सुचविली होती. असा ६९.८५ कोटींचा निधी अतिरिक्त स्वरुपात उपलब्ध झालेला आहे.
यात महसुली उत्पन्न ४३.०२ कोटी, भांडवली उत्पन्न ४५९.६५ कोटी व असाधारण ऋण व निलंबन शुल्क २३.२६ कोटी असे एकूण ९२५.९३ कोटींचे उत्पन्न या अर्थसंकल्पात दर्शविण्यात आलेले आहे. याशिवाय सर्व बाबींवर ६१२.५१ कोटींचा खर्च वजा जाता महसुली ३१.१९ कोटी, भांडवली २६७.१२ कोटी व असाधारण रुण असे एकूण ३१३.४२ कोटी रुपये शिल्लक राहणार आहे. या अर्थसंकल्पीय सभेत सभागृहनेता तुषार भारतीय, विरोधी पक्षनेता बबलू शेखावत, विलास इंगोले, मिलिंद चिमोटे, प्रशांत डवरे, प्रकाश बनसोड, सुनील काळे, चेतन पवार, प्रदीप हिवसे, अजय गोंडाणे यांच्यासह अनेक सदस्यांनी मत मांडले.
पाईंटर
महसुली उत्पन्न
शिल्लक : ५८.९२ कोटी
उत्पन्न : ३८४.१० कोटी
एकूूण उत्पन्न : ४४.०२ कोटी
एकूण खर्च : ४११.८३ कोटी
अखेरची शिल्लक ३१.१९ कोटी
पाईंटर
अंदाजपत्रक गोषवारा
शिल्लक : ३३५.२३ कोटी
उत्पन्न : ५८२.७० कोटी
एकूूण उत्पन्न : ९२५.९३ कोटी
एकूण खर्च : ६१२.५१ कोटी
अखेरची शिल्लक ३१३.४२ कोटी
कोट
अमरावतीकरांच्या आशा, आकांक्षेला समान न्याय देणारा हा अर्थसंकल्प आहे. नाागरिकांच्या सोयी-सुविधा व सरक्षितेच्या दृष्टीने यात भरीव तरतूद करण्यात आलेली आहे.
- चेतन गावंडे,
महापौर
कोट
जनतेची दिशाभूल करणारे हे बजेट आहे. यात उत्पन्न वाढीसाठी कुठलेही प्रयत्न करण्यात आलेले नाही. यापूवीर्च्या बजेटमध्ये करण्यात आलेल्या तरतुदीनुसार खर्च झालेला नाही.
- बबलू शेखावत,
विरोधी पक्षनेता
बॉक्स
शहर आता सीसीटीव्हीच्या निगराणीत
शहर सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रमुख चौकात सीसीटीव्ही कॅमरे लागले पाहिजे व यासाठी ५ कोटींच्या तरतुदीची मागणी त्यांनी केली. यावर बबलू शेखावत यांनी कामाला वेळेचे बंधन लावू नका व यासंर्दभात पोलीस विभागाशी चर्चा करावी लागेल, असे स्पष्ट केले. सभापती चेतन गावंडे यांनी या कामासाठी ५ कोटींची तरतूद करण्यात येणार असल्याचे सभागृहाला सांगितले.
बॉक्स
आशा वर्करच्या मानधनात १ हजार रुपयांची वाढ
कोविड काळात जिवावर उदार होऊन कार्य करणाऱ्या सर्व आशा वर्करला सरसकट १ हजार रुपयांची वाढ करण्याची मागणी सदस्यांनी सभागृहात लावून धरली. वित्त आयोगाचे निधीचे व्याजातून १३० नियमित व अन्य कंत्राटी आशा वर्करला ही मदत देण्यात येणार असल्याचे सभापती चेतन गांवडे म्हणाले. बबलू शेखावत, तुषार भारतीय, विलास इंगोले, प्रकाश बनसोड आदींनी हा विषय लावून धरला.
बॉक्स
वाॅर्ड विकास, स्वेच्छा निधीवरून सत्ताधारी- विरोधकांमध्ये जुंपली
अर्थसंकल्पाच्या ७.७५ कोटी मूळ तरतुदीत सदस्यांच्या वाॅर्ड विकास व स्वेच्छा निधीत प्रत्येकी ७.७५ कोटींची तरतूद स्थायी समितीत करण्यात आली. प्रत्येक सदस्याला वाॅर्ड विकासचे २५ लाख व स्वेच्छा निधीचे २५ लाख एकमुस्त मिळायला पाहिजे, अशी मागणी प्रकाश बनसोड, तुषार भारतीय, मिलिंद चिमोटे यांनी केली. उत्पन्न वाढल्यावर टप्प्याटप्याने देणार, असे मुख्य लेखाधिकाऱ्यांनी स्पष्ट केल्याचे विलास इंगोले म्हणाले. या विषयावर सभागृहात चांगलेच घमासान झाले. अखेर सभापती चेतन गावंडे यांनी वाॅर्ड विकास व स्वेच्छा निधी एकमुस्त देण्याची तयारी प्रशासनाने करावी, असे निर्देश दिले.
बॉक्स
जाहिरात शुल्कासाठी येत्या आमसभेत प्रस्ताव
अर्थसंकल्पात जाहिरातींवरचा खर्च वाढविला नसल्याबाबतची विचारणा प्रशांत डवरे यांनी केली. २९ जानेवारीचा शासन निर्णय सभागृहासमोर का ठेवण्यात आलेला नाही, अशी विचारणा चेतन पवार यांनी केली. जाहिरात परवाना शुल्ल्क अस्तित्वात आहे व धोरण महापालिकेलाच निश्चित करावे लागणार आहे. येत्या आमसभेत याविषयीचा प्रस्ताव ठेवू व किती शुल्क आकारावे याविषयीचे प्रारूप तयार करू, असे आयुक्त प्रशांत रोडे यांनी स्पष्ट केले.
आमसभेच्या तरतुदी
----------------
* काही विभागाचे संगणकीकरणासाठी ५ कोटी
* शहरातील प्रमुख चौकात सीसीटीव्हीसाठी ५ कोटी
* आशा वर्करच्या मानधनात १ हजारांनी वाढ
* येत्या आमसभेत जाहिरात शुल्क धोरणावर प्रस्ताव
* संत गाडगेबाबा स्वच्छता पुरस्कारासाठी नवे शीर्ष
* कर्क रोग, ब्रेनट्युमर रुग्णांसाठी १० हजारांची मदत
*झोपडपट्टी विकास अंबानाल्याचे कामांसाठी १ कोटी