‘महेफिल’प्रकरणी महापालिकेची चुप्पी
By Admin | Updated: July 7, 2015 00:23 IST2015-07-07T00:23:37+5:302015-07-07T00:23:37+5:30
स्थानिक कॅम्प स्थित हॉटेल महेफिल ईन आणि ग्रँड महेफिलच्या संचालकांनी विना परवानगीने अतिरिक्त बांधकाम केल्यानंतरही..

‘महेफिल’प्रकरणी महापालिकेची चुप्पी
राजकीय दबावतंत्र : अहवाल गुलदस्त्यात
अमरावती : स्थानिक कॅम्प स्थित हॉटेल महेफिल ईन आणि ग्रँड महेफिलच्या संचालकांनी विना परवानगीने अतिरिक्त बांधकाम केल्यानंतरही वस्तुनिष्ठ अहवाल तयार करण्यात आले नसल्याची धक्कादायक माहिती आहे. तर दुसरीकडे शहरात मोठ्या प्रमाणात कारवाईचा सपाटा सुरु असताना ‘महेफिल’ प्रकरणी महापालिका प्रशासनाने चुप्पी का साधली? यावरुन तर्कवितर्क लावले जात आहे.
आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी विना परवानगीने बांधकाम करणाऱ्या ‘महेफिल’ ची तपासणी करुन बांधकामाचा वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचे कळविले होते. त्याअनुषंगाने सहायक संचालक नगररचना सुरेंद्र कांबळे यांच्या नेतृत्त्वात ‘महेफिल’ च्या बांधकामाचे मोजमाप करण्यात आले तेंव्हा या दोन्ही हॉटेलच्या बांधकामात तफावत आढळून आली.
मंजुरीपेक्षा जास्त बांधकामा करण्यात आल्याचे महापालिका चमुच्या निदर्शनास आले. मात्र, ‘महेफिल’ चे नेमके किती बांधकाम अतिरिक्त याचा वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले होते. ‘महेफिल’ विना परवानगीचे बांधकाम तपासणी झाल्यानंतरही आयुक्तांच्या पुढ्यात अद्यापर्यंत अहवाल सादर करण्यात आला नाही. आयुक्तांनी कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता ‘महेफिल’च्या बांधकामाची तपासणी करुन विना परवानगीच्या बांधकामांना अतिरिक्त दंड ठोठावण्याची तयारी चालविली आहे. पंरतु दंड ठोठावताना किती बांधकाम अतिरिक्त हे अजुनही अहवालाद्वारे स्पष्ट झाले नाही.
महेफिल’ प्रकरणाचा अहवाल तयार झाला आहे. परंतु तो बघितला नाही. वाहतुक ीस अडथळा असणारे बांधकाम तोडले जाईल. विनापरवानगीचे बांधकाम असेल तर दंडात्मक कारवाई करुन रक्कम तिजोरीत जमा करू.
- चंद्रकांत गुडेवार,
आयुक्त, महापालिका.