महापालिकेत सभागृह नेत्यावर संक्रांत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2019 06:00 AM2019-12-09T06:00:00+5:302019-12-09T06:00:30+5:30

सर्वांना समान न्याय नाही, असा विद्यमान सभागृहनेता सुनील काळे यांच्यावर काही नगरसेवकांचा आक्षेप आहे व तो त्यांनी पक्षश्रेष्ठी, पदाधिकाऱ्यांसमोर सक्षमपणे मांडल्याची माहिती आहे. सध्या भाजपक्षात संघटनात्मक निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. येत्या १५ डिसेंबरला शहराध्यक्षपदाची निवड होती; ती आता ३० डिसेंबरला होणार आहे.

Municipal corporation on the leader of the house! | महापालिकेत सभागृह नेत्यावर संक्रांत !

महापालिकेत सभागृह नेत्यावर संक्रांत !

Next
ठळक मुद्देबदलाचे वारे जोरात : डिसेंबरच्या आमसभेत नव्या चेहऱ्याला संधी मिळण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : महापालिकेत महापौर व उपमहापौर बदलल्यानंतर आता सभागृहनेता बदलाचे वारे जोराने वाहू लागले आहे. नगरसेवकांत धूमसत असलेला असंतोष व त्यावर भाजपनेत्यांची ठोस भूमिका पाहता, या महिन्याच्या महासभेत नव्या सभागृहनेत्याची घोषणा होण्याची दाट शक्यता आहे.
सर्वांना समान न्याय नाही, असा विद्यमान सभागृहनेता सुनील काळे यांच्यावर काही नगरसेवकांचा आक्षेप आहे व तो त्यांनी पक्षश्रेष्ठी, पदाधिकाऱ्यांसमोर सक्षमपणे मांडल्याची माहिती आहे. सध्या भाजपक्षात संघटनात्मक निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. येत्या १५ डिसेंबरला शहराध्यक्षपदाची निवड होती; ती आता ३० डिसेंबरला होणार आहे. दरम्यान, सभागृहनेता बदलावरून पक्षामध्ये घमासान सुरू झाले आहे.
तसे पाहता महापौर व उपमहापौरपदाच्या निवडीच्या वेळीच सभागृहनेत्याच्या महापालिकेतील भूमिकेला अनेक सदस्यांनी उघडपणे विरोध दर्शवून पक्षनेतृत्वाकडे कैफियत मांडली होती. महापौर व उपमहापौरांप्रमाणेच यांचाही कार्यकाळ संपवा व पक्षाच्या निष्ठावान सदस्याला सभागृहनेत्याची संधी द्या, अशी मागणी त्याचवेळी जोरकसपणे पुढे आली. या पदासाठी इच्छुकांनी दावेदारीदेखील केली आहे. यापूर्वी महापौरपदासाठी इच्छुक असलेले सचिन रासने, चंद्रकांत बोमरे यांच्यासह तुषार भारतीय यांची नावे सभागृहनेतेपदासाठी चर्च्चेत आहेत.
मुळात माजी महापौर संजय नरवणे, विद्यमान सभागृहनेता सुनील काळे हे मूळ भाजपचे नाहीत. ते प्रवेशित पदाधिकारी आहेत. त्यांनाच संधी दिली जाते, असा काही नगरसेवकांचा खुला आरोप आहे. असाच आरोप संध्या टिकले यांच्यावरही होत आहे. त्यांनी मध्यंतरी जगदीश गुप्ता यांच्या गटाची कास धरली होती. त्यामुळे पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांना न्याय केव्हा, अशी विचारणा भाजपश्रेष्ठींना होत आहे. आता महापालिकेत भाजपक्षाची एकहाती सत्ता आहे. त्यामुळेच पक्षाच्या कार्यकर्त्यांनाच न्याय मिळावा, या मागणीने आता उचल खाल्ली आहे.
महापौर व उपमहापौर निवडणुकीत भाजपक्षाद्वारे याच नीतीचा अवलंब केला गेला. आता इच्छुकांपैकी एकाला सभागृहनेता केले जाऊ शकते व याची घोषणा याच महिन्याच्या आमसभेत केली जाऊ शकते, अशी विश्वसनीय माहिती आहे.

सभागृहनेत्यावर हा आक्षेप
सर्व सदस्यांना समान निधीचे वाटप करण्यात आलेले नाही. त्यामुळे ज्यांना निधी मिळाला नाही, ते सर्व नगरसेवक नाराज आहेत. निधीचे वाटप निकटस्थ सदस्यांनाच करण्यात आले व यामध्ये कमालीची गुप्तता पाळली गेली. सर्व नगरसेवकांना विश्वासात घेतले जात नाही. महापालिकेत काही सदस्यांनाच झुकते माप दिले जाते. यासह अनेक आक्षेप सदस्यांनी पदाधिकाऱ्यांसमक्ष मांडले आहेत. त्यामुळे आता नवा सभागृहनेता निवडीची दाट शक्यता आहे.

पक्षश्रेष्ठींद्वारे 'डॅमेज कंट्रोल'
महापालिकेतील काही कामांत कंत्राटदारासह भागीदारीने काही सदस्यांचा अप्रत्यक्ष सहभाग आहे. अशीच स्थिती उद्यानांच्या कामातदेखील आहे. तेथेही काहींची भागीदारीच असल्याचा आरोप आहे. याची आता उघड चर्चा शहरात सुरू असल्याने पक्षाची नाहक बदनामी होत असल्याचा आरोप काही सदस्यांनी केला. हे सर्व कारनामे पक्षश्रेष्ठींच्या पुढ्यात मांडल्याची विश्वसनीय माहिती आहे. त्यामुळे या कंत्राटदार सदस्यांवर नेतृत्वाची खपामर्जी झाल्याने 'डॅमेज कंड्रोल' केले जाईल, असे सूत्रांनी सांगितले.

आयुक्तांकडे होणार नोंद !
महापालिकेच्या सभागृहात भाजपचे सर्वाधिक ४५ सदस्य आहेत. या पक्षाचे गटनेता सुनील काळे आहेत. त्यांच्यासह युवा स्वाभिमानचे तीन व रिपाइंचा एक अशा ४९ सदस्यांच्या गटाची स्वतंत्र नोंदणी ही विभागीय आयुक्तांकडे आहे. त्यामुळे सभागृहात भाजपक्षाचे संख्याबळ हे सर्वाधिक असल्याने या पक्षाचा गटनेता हा सभागृहनेता म्हणून ओळखला जातो व त्यांना काही विशेषाधिकारदेखील असतात.

अशी आहे प्रक्रिया
भाजपचे शहाराध्यक्षांकडून गटनेता बदलासह नव्या गटनेत्याच्या नावाचे पत्र हे महापालिकेच्या नगरसचिवांना प्राप्त होते. त्यानंतर हे पत्र नगरसचिवांद्वारे नोंदणीसाठी विभागीय आयुक्तांकडे सादर केले जाते. त्यानंतर या नावाची रीतसर घोषणा सभापती आमसभेत करतात, अशी माहिती आहे.

Web Title: Municipal corporation on the leader of the house!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.