पोटनिवडणुकीसाठी महापालिकेच्या कसरती
By Admin | Updated: July 9, 2016 00:14 IST2016-07-09T00:14:16+5:302016-07-09T00:14:16+5:30
महापालिकेची सार्वत्रिक २०१७ च्या पुर्वार्धात अपेक्षित असताना औटघटकेच्या नगर सेवकासाठी पालिकेला खर्चासह दोन वेळा...

पोटनिवडणुकीसाठी महापालिकेच्या कसरती
अतिरिक्त खर्च : १६ रोजी प्रारुप मतदार यादी
अमरावती : महापालिकेची सार्वत्रिक २०१७ च्या पुर्वार्धात अपेक्षित असताना औटघटकेच्या नगर सेवकासाठी पालिकेला खर्चासह दोन वेळा निवडणूकीच्या सर्व कसरती कराव्या लागत आहे. निवडणूक आयोगाने नवाथे प्रभागाच्या एका रिक्त जागेसह अन्य महापालिकांमधील पोटनिवडणूकीसाठी मतदारयादीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या अनुषंगाने १६ जुलै रोजी नवाथे प्रभाग क्र.३२ ब साठी प्रारुप मतदार यादी प्रसिध्द होणार आहे.
शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक दिगंबर डहाके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या या पोटनिवडणूकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने निर्देश प्राप्त झालेत. त्या अनुषंगाने निवडणूक अधिकारी तथा नगरसचिव मदन तांबेकर यांनी प्रक्रियेस वेग दिला आहे. १६ जुलै रोजी घोषित होणाऱ्या प्रारुप मतदार यादीवर २३ जुलैपर्यत स्थानिक मतदारांकडून सूचना ,आक्षेप, हरकत मागविल्या जाणार आहेत. दरम्यान औटघटकेच्या या नगरसेवकपदांसाठी कोण कुणावर मेहरबान होईल, हे पाहणे औत्सुक्याचे राहणार आहे. पोटनिवडणूकीच्या माध्यमातून सार्वत्रिक निवडणूकीची रंगीत तालीम करुन घ्यायची की एखाद्या उमेदवाराला पाठिंबा देवून त्याला अविरोध पालिकेत पाठवायचे, यावर राजकीय पक्षांमध्ये चर्वितचर्वण सुरु आहे. पोटनिवडणूकीची तारीख निश्चित न झाल्याने मोठया राजकीय पक्षांनी, त्यांच्या नेत्यांनी अद्यापर्यत तरी या निवडणूकीत 'रस' घेतलेला नाही.
निवडणूकीचा प्रशासकीय खर्च
निवडणूकीचा प्रशासकीय खर्च सरकारी दराने ५० रुपये प्रतिमतदार धरल्यास १५ हजार मतदारांच्या या प्रभागात ७ लाख ५० हजार इतके रुपये खर्च होईल, शिवाय इतर दैनंदिन कामे सोडून कर्मचारी पोटनिवडणूक प्रक्रियेत गुंततील. निवडणूक घोषीत होईल त्या दिवशीपासून निकाल लागेपर्यत या प्रभागासाठीच आचार संहिता लागेल.