महापालिकेत काँग्रेसची आघाडी राष्ट्रवादीसोबतच
By Admin | Updated: September 8, 2014 00:55 IST2014-09-08T00:55:45+5:302014-09-08T00:55:45+5:30
महापालिकेत यापूर्वी सत्ता स्थापनेसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी करण्यात आली आहे. हीच आघाडी मंगळवारी महापौर,

महापालिकेत काँग्रेसची आघाडी राष्ट्रवादीसोबतच
अमरावती : महापालिकेत यापूर्वी सत्ता स्थापनेसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी करण्यात आली आहे. हीच आघाडी मंगळवारी महापौर, उपमहापौरपदाच्या निवडणुकीत राहील, असा दावा राष्ट्रवादीचे गटनेता सुनील काळे यांनी रविवारी पत्रपरिषदेत केला. आघाडी करण्याच्या अनुषंगाने वरिष्ठ पातळीवर घडामोडी सुरुअसल्याची माहिती त्यांनी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेस गटनेतेपदाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने स्थगनादेश दिल्याच्या पार्श्वभूमीवर पत्रपरिषदेत महापौर, उपमहापौरपदाच्या निवडणूकविषयी काळे यांनी पक्षाची भूमिका विशद केली. काळे यांच्या माहितीनुसार, उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राष्ट्रवादी काँग्रेस फ्रंटच्या गटनेतेपदी अविनाश मार्डीकर यांना कायम ठेवल्याच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने ५ सप्टेंबर रोजी स्थगनादेश दिला. त्यामुळे महापालिकेत राजकीय परिस्थिती बदलली असून आता राष्ट्रवादीचे गटनेता म्हणून सुनील काळे यांनाच महापौर, उपमहापौर पदाच्या निवडणुकीत सदस्यांना ‘व्हीप’ देण्याचा अधिकार असल्याचा दावा त्यांनी केला. सर्वोच्च न्यायालयाने कोणताही पक्ष हा आघाडी किंवा फ्रंटमध्ये विलीन होऊ शकत नाही, या मुख्य मुद्यासाठी याचिकेवर भर देण्यात आला होता. त्यानुसार सर्वोच्च न्यायालयाने खंडपीठाच्या निर्णयावर स्थगनादेश देत सुनील काळे यांना पुढील निर्णयापर्यंत अधिकार बहाल करण्याचे आदेशात म्हटले आहे. एवढेच नव्हे, तर राष्ट्रवादी पक्षाचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी महापौर, उपमहापौरपदाच्या निवडणुकीत सदस्यांनी सुनील काळे यांनी काढलेल्या पक्षदेशाचे पालन करावे, असे सुचविले आहे. सर्वोच्च न्यायालय आणि राष्ट्रवादी पक्षाने माझ्या नावावर गटनेता म्हणून शिक्कामोर्तब केल्याने सर्व वाद संपुष्टात आल्याचे काळे यांनी सांगितले. महापौर, उपमहापौरपदाच्या निवडणुकीत काँग्रेससोबत आघाडी करण्यासाठी राष्ट्रवादीकडे संख्याबळ असून ते मंगळवारी दिसून येईल, असा दावा त्यांनी केला. त्यानुसार संख्याबळाच्या जुळवणुकीसाठी काही पक्षांशी बोलणी सुरु असून निश्चितपणे राष्ट्रवादीचाच महापौर बनेल, असा विश्वास सुनील काळे यांनी यावेळी व्यक्त केला. सध्या राष्ट्रवादीत १० सदस्यांचे संख्याबळ असून ही संख्या दोन दिवसांत १८ च्या वर पोहचेल. ‘व्हीप’ न पाळणाऱ्यांविरुद्ध अपात्रतेची कारवाई केली जाईल, असे काळे म्हणाले. पत्रपरिषदेला सुनील वऱ्हाडे, नितीन हिवसे, प्रवीण मेश्राम, गणेश खारकर, सपना ठाकूर, जयश्री मोरय्या, आशा निंदाने, श्रेयस वैष्णव उपस्थित होते.