बाभळीच्या पुलासाठी पालिकेचे नाहरकत प्रमाणपत्र
By Admin | Updated: December 14, 2015 00:23 IST2015-12-14T00:23:31+5:302015-12-14T00:23:31+5:30
बाभळी येथील चंद्रभागा नदीवरील जीवघेण्या लहान पुलाच्या बांधकामाचे नाहरकतप्रमाणपत्र अखेर ठराव घेऊन नगरपालिकेने सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहे.

बाभळीच्या पुलासाठी पालिकेचे नाहरकत प्रमाणपत्र
बांधकामाचा मार्ग सुकर : जबाबदारी आता लोकप्रतिनिधींची
संदीप मानकर दर्यापूर
बाभळी येथील चंद्रभागा नदीवरील जीवघेण्या लहान पुलाच्या बांधकामाचे नाहरकतप्रमाणपत्र अखेर ठराव घेऊन नगरपालिकेने सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहे. आता या पुलाच्या बांधकामाचा मार्ग सुकर झाला असून आता पुलाची बांधकामाची जबाबदारी लोकप्रतिनिधींची आहे, अशी भावना बाभळीवासीयांनी व्यक्त केली आहे.
नदीच्या लहानपुलाच्याखाली मोठा डोह असल्याने व येथे बाराही महिने गाळ व दूषित पाणी साचले असल्याने अंदाजे तीस वर्षांत ३५ निष्पाप लोकांचे बळी गेले आहेत. तसेच येथे गुराढोरांचेही प्राण गेले आहे. अनेकांनी तर येथे आत्महत्या केल्या. तर, पुलावरुन पाणी वाहत असताना गेल्यामुळे अनेक वाहून गेले आहे. त्यामुळे हा पूल तोडून नव्याने रुंदीकरण करावे, अशी दर्यापूर, बनोसा व बाभळी परिसरातील लोकांची मागणी आहे. परंतु या पुलाचा प्रस्ताव पाठविण्यामध्ये आतापर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाला अडचण येत होती. कारण हा पूल नगरपालिकेने करावा की आमदार निधीतून सार्वजनिक बांधकाम विभागाने करावा, असा वाद नेहमीच रंगत होता.दरम्यान या पुलावरून अनेकांचा अपघात झाला. परंतु आता नगरपालिकेने नाहरकत प्रमाणपत्र दिल्याने या पुलाचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाने तयार करून शासनाकडे पाठवावा व यासाठी आमदार रमेश बुंदिले यांनी प्रयत्न करावे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष जयंत वाकोडे व बाभळी येथील समस्त नागरिकांनी केली आहे. (प्रतिनिधी)
सार्वजनिक बांधकाम विभागाचे पत्र आल्यानंतर आम्ही नगर पालिकेत ठराव घेऊन या पुुलाच्या बांधकामासाठी नाहरकत प्रमाणपत्र दिले आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने नवीन प्रस्ताव पाठवावा व लोकप्रतिनिधीने यासाठी प्रयत्न करावे. पूल झाल्यास मला आनंदच होईल. लोकांची समस्या कायमची सुटेल.
- वंदना राजगुरे, नगराध्यक्ष, दर्यापूर.
बाभळी येथील नदीच्या पुलाच्या रुंदीकरणा संदर्भात प्रस्ताव तयार करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्याला निर्देश दिले आहे. लवकरच बांधकाम विभाग हा प्रस्ताव शासनाच्या मंजुरातीसाठी पाठविणार आहे.
- रमेश बुंदिले,
आमदार, दर्यापूर मतदारसंघ.