बडनेऱ्यात महापालिका संकुलाचा करारनामा अडकला
By Admin | Updated: August 27, 2014 23:13 IST2014-08-27T23:13:43+5:302014-08-27T23:13:43+5:30
महापालिक ाव्दारा निर्मित बडनेरा नविवस्ती येथील महात्मा गांधी व्यापारी संकुलाचा करारनामा संपुष्टात आला असून तो नव्या अटी, शर्तीनुसार करण्यासाठी प्रशासनाने व्यापाऱ्यांना नोटिशी बजावल्या आहेत.

बडनेऱ्यात महापालिका संकुलाचा करारनामा अडकला
अमरावती : महापालिक ाव्दारा निर्मित बडनेरा नविवस्ती येथील महात्मा गांधी व्यापारी संकुलाचा करारनामा संपुष्टात आला असून तो नव्या अटी, शर्तीनुसार करण्यासाठी प्रशासनाने व्यापाऱ्यांना नोटिशी बजावल्या आहेत. मात्र व्यापाऱ्यांचा अनामत रक्कम, बाजार परवाना व एलबीटी नोंदणीला नकार असल्याने सोमवारी याविषयी आयुक्तांसमवेत पार पडलेल्या बैठकीत तोडगा निघू शकला नाही.
बडनेऱ्यातील महात्मा गांधी व्यापारी संकुलाचा ३० वर्षांचा व्यावसायिकांसोबत असलेला करारनामा संपुष्टात आल्याने महापालिकेच्या बाजार परवाना विभागाने ५१ व्यापाऱ्यांना नव्याने करारनामा आणि अनामत रक्कमेबाबतची नोटीस बजावली. ही नोटीस बजावून दीड महिन्यांचा कालावधी झाला असताना व्यापाऱ्यांना करारनामा करण्यात यश आले नाही. मध्यतंरी आ. रवी राणा यांनी व्यावसायिकांना न्याय देण्याच्या अनुषंगाने महापालिकेत बैठक घेतली. मात्र काहीच यश हाती आले नाही. तीन ते चार वेळा याविषयी बैठकी घेण्यात आल्यात. प्रशासन आणि व्यापारी आपआपल्या भूमिकेवर ठाम आहेत. व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार ३० वर्षांपूर्वी करारनामा झाला असताना नव्याने करारनामा करण्याची गरज नाही. अव्वाच्या सव्वा अनामत रक्कम भरण्याइतका बडनेऱ्यात व्यवसाय नसल्याने प्रशासनाने याविषयी सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी केली आहे. सोमवारी पार पडलेल्या बैठकीत याच मुद्यावर आयुक्त अरुण डोंगरे यांनी व्यापाऱ्यांचे लक्ष वेधले. महापालिकेच्या उत्पन्न वाढीसाठी नवा करारनामा आणि वाढीव अनामत रक्कम आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र प्रशासन आपल्या निर्णयावर ठाम असल्याने कोणताच तोडगा निघाला नाही. अखेर याविषयी पुन्हा बैठक घेण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. यावेळी रिपाइंचे गटनेता प्रकाश बनसोड, विजय नागपुरे, चंदुमल बिल्दाणी, बळीराम ग्रेसपुंजे, उपायुक्त रमेश मवासी, प्रभारी लेखापरिक्षक राहुल ओगले, गंगाप्रसाद जयस्वाल, मानविराज दंदे, प्रकाश श्रृंगारे, पुरुषोत्तम हरवानी, नीलेश गुप्ता, प्रफुल्ल कासलिवाल, मनीष अमृतकर, मुन्ना देवडा, सोंळक ी, अशोक दुल्हाणी आदी व्यावसायिक उपस्थित होते.