अंबानगरीत ‘एक घर- एक वृक्ष’चा संकल्प; सामाजिक संस्थांचा पुढाकार
By प्रदीप भाकरे | Updated: July 6, 2023 17:21 IST2023-07-06T17:18:47+5:302023-07-06T17:21:22+5:30
नागरिकांनीही वृक्षलागवड करुन अमरावती शहराला हरित शहर करण्यासाठी सहकार्य करावे, असेही आवाहन मनपा आयुक्त पवार यांनी केले आहे.

अंबानगरीत ‘एक घर- एक वृक्ष’चा संकल्प; सामाजिक संस्थांचा पुढाकार
अमरावती : वृक्ष संवर्धन ही फक्त महानगरपालिका व शासनाची जबाबदारी न राहता ती लोक चळवळ होणे गरजेचे आहे. त्यापाश्वभूमिवर महापालिका हद्दीत ‘एक घर, एक वृक्ष’ ही संकल्पना राबविण्याचा मानस आयुक्त देविदास पवार यांनी व्यक्त केला आहे.
प्रत्येकाने आपल्या घरी, परिसरामध्ये, शहरात सुयोग्य ठिकाणी किमान एक वृक्ष लावून त्याचे संवर्धन करावे. तसेच झाडे लावण्याबाबत ५० घरांचे पालकत्व घ्यावे. वृक्ष लागण्यापुर्वीचे व वृक्ष लागवडीनंतर संबंधित जागेच्या जिओ-टॅग छायाचित्रासह विभागप्रमुखांकडे सादर करावा लागणार आहे. नागरिकांनीही वृक्षलागवड करुन अमरावती शहराला हरित शहर करण्यासाठी सहकार्य करावे, असेही आवाहन मनपा आयुक्त पवार यांनी केले आहे. वृक्ष लागवड व संगोपनाबाबत गुरूवारी आयुक्तांच्या कक्षात सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला शहरातील वेगवेगळ्या सामाजिक व स्वयंसेवी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
देशी झाडे लावली जाणार
शहरात वृक्ष लागवड ही डेन्स फॉरेस्ट, मियावाकी पद्धतीनुसार होण्याबरोबरच त्यात जास्तीत जास्त देशी वृक्षांचा वापर केला जाणार आहे. महानगरपालिकेचे आस्थापनेवरील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना देखील एक घर एक वृक्ष संकल्पना राबवायची आहे. बैठकीत शहर अभियंता इकबाल खान, सहाय्यक आयुक्त भुषण पुसतकर, नंदकिशोर तिखिले, तौसिफ काझी, कार्यकारी अभियंता रविंद्र पवार, सिस्टीम मॅनेजर अमित डेंगरे, उद्यान अधिक्षक श्रीकांत गिरी, मराठी विज्ञान परिषद च्या सुप्रिया गजभिये, सुशिलदत्त बागडे, डॉ.अल्बीना हक, स्वाती बडगुजर, निशी चौबे, अभिलाष नरोडे आदी उपस्थित होते.