शहरात आठ ठिकाणी 'मल्टिप्लेक्स पार्किंग'
By Admin | Updated: October 4, 2015 00:54 IST2015-10-04T00:54:32+5:302015-10-04T00:54:32+5:30
अरुंद रस्ते, वाढलेली वाहन संख्या आणि वाहनतळांचा अभाव यामुळे गुदमरलेल्या अमरावती शहराला आता मोकळा श्वास घेता येणार आहे.

शहरात आठ ठिकाणी 'मल्टिप्लेक्स पार्किंग'
सर्वेक्षण सुरू : प्रवीण पोटे यांचे प्रयत्न; उड्डाण पूल, बगिचे, कॉंक्रीटचे रस्तेही !
अमरावती : अरुंद रस्ते, वाढलेली वाहन संख्या आणि वाहनतळांचा अभाव यामुळे गुदमरलेल्या अमरावती शहराला आता मोकळा श्वास घेता येणार आहे. शहरात तब्बल आठ ठिकाणी 'पार्किंग मल्टिप्लेक्स' उभारले जाणार आहेत.
केंद्र शासनाच्या सुमारे ३५० कोटी रुपयांच्या निधीतून साकारले जाणाऱ्या या बहुमजली आधुनिक वाहनतळांसाठीचे सर्व्हेक्षण आज पार पडले. स्वप्नवत वाटणाऱ्या या योजनेचे किमयागार अमरावतीचे पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या नेतृत्वात नॅशनल हायवे अथॉरिटी आॅफ इंडियाचे प्रकल्प संचालक राजीव सूद, विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजुरकर, महापालिकेचे आयुक्त चंद्रकांत गुडेवार, सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधीक्षक अभियंता विजय बनगीनवार, कार्यकारी अभियंता संतोष जाधव यांच्या चमुने बडनेरा ते नागपूर रस्त्यावरील नवीन बायपास चौकापर्यंतचे पर्यंतचे सर्व्हेक्षण पूर्ण करुन या दिशेने पहिले निर्णायक पाऊ ल टाकले.
येथे होणार
पार्किंग मल्टिप्लेक्स!
नेहरु मैदान, प्रशांत नगर बगिच्यासमोरील जागा, नवाथे अंडरब्रिजजवळील रेल्वे लाईन लगत, दसरा मैदान, अंबादेवी (हल्लीच्या वाहनतळाच्या जागेवर), राजापेठ पोलीस ठाण्यामागील शॉपिंग कॉम्प्लेक्सजवळ, मोदी हास्पिटल परिसर, अकोला मार्गावरुन यवतमाळ वळणाचे कॉर्नर या सर्व ठिकाणी तीन किंवा चार मजली इमारतीत पार्किंगची सोय असेल. बहुतांश इमारतीतील 'टॉप फ्लोअर'वर सार्वजनिक उपयोगासाठीची जागा असेल.