फुटलेल्या जलवाहिनीमुळे चिखल
By Admin | Updated: July 19, 2015 00:17 IST2015-07-19T00:17:30+5:302015-07-19T00:17:30+5:30
सोफिया वजी प्रकल्पाच्या फुटलेल्या जलवाहिनीच्या पाण्यामुळे एका शेतकऱ्याच्या संपूर्ण शेतात चिखल निर्माण झाल्याने ..

फुटलेल्या जलवाहिनीमुळे चिखल
नुकसान : धरणात जलसमाधी घेण्याचा शेतकऱ्याचा इशारा
मोर्शी : सोफिया वजी प्रकल्पाच्या फुटलेल्या जलवाहिनीच्या पाण्यामुळे एका शेतकऱ्याच्या संपूर्ण शेतात चिखल निर्माण झाल्याने शेतकऱ्याने स्वातंत्र्यदिनाच्या वर्धापनदिनी १५ आॅगष्ट रोजी अप्पर वर्धा धरणात जलसमाधी घेण्याचा निर्णय घेतला.
येथील अप्पर वर्धा प्रकल्पातून नांदगाव पेठ औद्योगीक वसाहतीत असलेल्या सोफिया वजी प्रकल्पा करिता जलवाहिनी टाकून पाणी नेण्यात आले. पार्डी शिवारातील विनोद मारोतराव खरपकर यांच्याकडे शेत सर्वे नं ५/४ फक्त सव्वा एकर शेत आहे. त्यांच्या शेतातून सोफिया औष्णिक वीज प्रकल्पाची जलवाहिनी जमिनीच्या आतून चार वर्षांपूर्वी टाकण्यात आली. या जलवाहिनीतून सप्टेंबर २०११ मध्ये पाणी सोडल्यावर विनोद खरपकर यांच्या शेतातून गेलेली जलवाहिनी लिकेज झाली. त्यामुळे खरपकर यांच्या शेतातील उभे पीक पाण्याखाली आले. १९ सप्टेंबर २०११ ला या घटनेची माहिती महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांसोबतच कृषी विभाग आणि संबंधित औष्णिक वीज प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांना खरपकर यांनी दिली. महसूल आणि कृषी खात्यातर्फे सर्वेक्षण करुन त्यांच्या शेतात शिरलेल्या पाण्यामुळे पिकाच्या झालेल्या १०० टक्के नुकसानीचा अहवाल वीज प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांकडे पाठविला; तथापि अहवाल संदिग्ध असल्याचे कारण समोर करुन वीज प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी खरपकर यांना कोणतीही नुकसान भरपाई दिली नाही. औष्णिक वीज प्रकल्पाकरिता बारमाही पाणी जलवाहिनीतून सोडण्यात येत असल्यामुळे, जलवाहिनी लिकेज असल्यामुळे खरपकर यांच्या शेतात चिखल निर्माण झाला आहे. ( तालुका प्रतिनिधी)