महावितरणच्या उघड्या डीबी धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 05:01 IST2020-06-24T05:00:00+5:302020-06-24T05:01:15+5:30
महावितरणने शहरात काही भागांमध्ये वीजप्रवाहासाठी भुयारी केबल टाकले आहेत, तर बऱ्याच ठिकाणी विद्युत प्रवाहासाठी ट्रान्सफार्मरखाली डीबी उभारण्यात आल्या आहेत. या डीबीतून उच्च दाबाच्या वीजप्रवाहाचा संचार होत असताना त्याला समोरील भागात झाकण नाही, असे चित्र सर्वदूर आहे. हल्ली पावसाळा सुरू झाला असताना डीबीला झाकण नसल्याने पावसाचे पाणी आतमध्ये शिरण्याची शक्यता आहे.

महावितरणच्या उघड्या डीबी धोकादायक
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी अर्थात महावितरणने उभारलेले विद्युत वितरण बॉक्स (डीबी) बहुतांश ठिकाणी सताड उघडे असल्याने ते धोकादायक ठरणारे आहे. काही डीबी या नाल्याच्या काठावर, मैदाने, क्रीडागंणालगत असल्याने त्यातून होणाऱ्या उच्च दाब वीज प्रवाहामुळे जीवितहानी होण्याची दाट शक्यता आहे. या गंभीर बाबीकडे महावितरणने लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
महावितरणने शहरात काही भागांमध्ये वीजप्रवाहासाठी भुयारी केबल टाकले आहेत, तर बऱ्याच ठिकाणी विद्युत प्रवाहासाठी ट्रान्सफार्मरखाली डीबी उभारण्यात आल्या आहेत. या डीबीतून उच्च दाबाच्या वीजप्रवाहाचा संचार होत असताना त्याला समोरील भागात झाकण नाही, असे चित्र सर्वदूर आहे. हल्ली पावसाळा सुरू झाला असताना डीबीला झाकण नसल्याने पावसाचे पाणी आतमध्ये शिरण्याची शक्यता आहे. डीबीचे झाकण चोरीस जाते की ते तोडले जाते, याबाबत महावितरण शोध घेण्यास अपयशी ठरली आहे. डीबी उभारल्यानंतर कर्मचारी त्याकडे लक्ष देत नाहीत. विद्युत प्रवाहासाठी असलेल्या डीबीची डागडुजी, दुरुस्तीकरिता पुढाकार घेण्यात येत नाही, हे वास्तव आहे.
झाकण दुरूस्तीसाठी टाळाटाळ
डीबीचे झाकण तुटले अथवा नादुरुस्त असल्यास ते पुन्हा योग्य करण्याची जाबाबदारी महावितरणची आहे. असे असताना शहर वा ग्रामीण भागात ट्रॉन्सफार्मरच्या खाली उभारण्यात आलेल्या डीबी कधी सुरळीत होणार, असा सवाल उपस्थित होत आहे. जीवितहानी झाल्यानंतर महावितरण कंपनीला जाग येईल का, असा जाब नागरिकांकडून विचारला जात आहे. झाक ण दुरुस्तीसाठी होत असलेली टाळाटाळ थांबावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
तीन महिन्यांच्या वीज देयकांनी ग्राहक त्रस्त
महावितरणने लॉकडाऊनच्या काळातील तब्बल तीन महिन्यांची वीज देयके ग्राहकांना पाठविली. रक्कम पाहून अनेकांचे डोळे विस्फारले आहेत. गरीब, कष्टकरी, शेतमजूर, कामगार मार्च ते मे असे तीन महिने घरीच लॉकडाऊन होते. आता कोरोनासह या नव्या वीज देयकांचा सामना करावा लागत आहे. तीन महिन्यांचे वीज देयके माफ करावेत, अशी मागणी सर्वसामान्य नागरिक, कष्टकऱ्यांमधून होत आहे.