‘स्मार्ट सिटी’साठी खासदार महापालिकेत
By Admin | Updated: September 15, 2015 00:21 IST2015-09-15T00:21:54+5:302015-09-15T00:21:54+5:30
‘स्मार्ट सिटी’ उपक्रम आणि एअरटेल कंपनीला ४-जी सेवा पुरविण्यासाठी भुयारी खोदकाम परवानगीसाठी होणाऱ्या ..

‘स्मार्ट सिटी’साठी खासदार महापालिकेत
‘रिलायन्स’चा मुद्दा : कंपनीविरुद्ध गाडगेनगर, फ्रेजरपुरा पोलिसांत तक्रार
अमरावती : ‘स्मार्ट सिटी’ उपक्रम आणि एअरटेल कंपनीला ४-जी सेवा पुरविण्यासाठी भुयारी खोदकाम परवानगीसाठी होणाऱ्या विलंबाचा जाब विचारण्यासाठी खा. आनंदराव अडसूळ सोमवारी महापालिकेत दाखल झाले. आयुक्त गुडेवार यांच्याशी चर्चा करताना त्यांनी काही बाबींवर प्रकाश टाकला. नागरिकांची कामे वेळेपूर्वी करण्याच्या सूचना खासदारांनी दिल्यात.
आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या दालनात पार पडलेल्या बैठकीला खा. आनंदराव अडसूळ, नगरसेवक प्रशांत वानखडे, राजेंद्र तायडे, सुनील राऊत, पंजाबराव तायवाडे, सुनील भालेराव, प्रभारी शहर अभियंता जीवन सदार, कार्यकारी अभियंता अनंत पोतदार आदी उपस्थित होते. यावेळी खा. अडसूळ यांनी ‘स्मार्ट सिटी’ उपक्रमात नागरिकांना कोणत्या सुविधा पुरविल्या जाणार, याविषयी माहिती जाणून घेतली. ‘स्मार्ट सिटी’त गरीब वस्त्या, सामान्य माणसांना केंद्रबिंदू मानून विकास आराखडा तयार झाला पाहिजे, असे खासदारांनी सांगितले. तसेच एअरटेल कंपनीने शहरात ४- जी सेवा पुरविण्यासाठी १६.५० कि.मी. भुयारी केबल खोदकामाची परवानगी मागितली असताना ती का देण्यात आली नाही? असा सवाल खासदारांनी आयुक्तांना विचारला. शहरात वीज कंपनीला खोदकामासाठी परवानगी दिली. मात्र, एअरटेल कंपनीला परवानगी देण्यास विलंब होत असल्याबद्दल अडसूळ यांनी नाराजी व्यक्त केली. परवानगीसाठी पाठविलेली शुल्काची मागणी अवाजवी असल्याचे खासदारांनी सांगितले. नागपूर महापालिकेच्या धर्तीवर एअरटेल कंपनीकडून रक्कम वसूल करावी, तसेच गाडगेनगर, फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यातील तक्रार मागे घ्यावी, असे खा. अडसूळ म्हणाले. मात्र आयुक्त गुडेवार यांनी प्रशासनाची कारवाई ही नियम सुसंगत असल्याचे ठामपणे सांगितले. (प्रतिनिधी)