खासदारांकडून ‘डॅमेज कंट्रोल’चा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2022 05:00 AM2022-02-13T05:00:00+5:302022-02-13T05:00:53+5:30

महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांच्यावर ९ फेब्रुवारी रोजी शिवप्रेमी, काही महिलांनी शाई फेकून राजापेठ उड्डाणपुलावरून छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटविल्याचा निषेध नोंदविला. याप्रकरणी आमदार रवी राणा यांच्यासह ११ जणांवर भादंविचे ३०७, ३५३, ३३२, १४३, १४७, १४८, १४९, १०९, १२० ब, ४२७, ५००, ५०१ अन्वये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले.

MP seeks 'damage control' | खासदारांकडून ‘डॅमेज कंट्रोल’चा प्रयत्न

खासदारांकडून ‘डॅमेज कंट्रोल’चा प्रयत्न

Next
ठळक मुद्देराजापेठ पोलीस ठाण्यात बॅरिकेडिंग आरोपींना भेटता येणार नसल्याचे केले स्पष्ट

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : महापालिका आयुक्तांवर शाईफेक प्रकरण, त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर आमदार रवी राणा यांच्यासह ११ जणांवर दाखल झालेल्या गंभीर गुन्ह्याच्या अनुषंगाने जिल्ह्यात राजकारण तापले आहे. शनिवारी अमरावतीत पोहोचलेल्या खासदार नवनीत राणा यांनी या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या आणि महापालिका आयुक्तांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. तथापि, आयुक्तांनी प्रकृतीच्या कारणास्तव खासदारांची भेट नाकारली. त्यामुळे आयुक्तांच्या भेटीसाठी आलेल्या खासदारांना शासकीय बंगल्यावरून आल्यापावली परतावे लागले. यामुळे खासदारांचा ‘डॅमेज कंट्रोल’ची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. 
महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांच्यावर ९ फेब्रुवारी रोजी शिवप्रेमी, काही महिलांनी शाई फेकून राजापेठ उड्डाणपुलावरून छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटविल्याचा निषेध नोंदविला. याप्रकरणी आमदार रवी राणा यांच्यासह ११ जणांवर भादंविचे ३०७, ३५३, ३३२, १४३, १४७, १४८, १४९, १०९, १२० ब, ४२७, ५००, ५०१ अन्वये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले. पाच आरोपींना अटक करण्यात आली असून, अन्य आरोपींचा शोध सुरू आहे. परंतु, या प्रकरणावरून जिल्ह्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. खासदार, आमदार राणा दाम्पत्याने गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होण्यामागे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालकमंत्री यशोमती ठाकूर हे असल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, शनिवारी खासदार राणांनी राजापेठ पोलीस ठाण्यात जाऊन अटकेतील आरोपींची भेट घेण्याचा मानस व्यक्त केला. मात्र आरोपींना भेटता येणार नाही, अशी भूमिका पोलिसांनी घेतली.

२.२० मिनिटांनी तूतू-मैमै...

दुपारी २.१५ वाजता खासदार राणा राजापेठ ठाण्यात पोहोचल्या. पाठीराख्यांना बॅरिकेडजवळ थांबविण्यात आले. सर्वांना आत येऊ द्यावे, यासाठी खासदार आग्रही होत्या. त्यामुळे खासदार व राजापेठचे ठाणेदार मनीष ठाकरे यांच्यात शाब्दिक चकमक झाली. अखेर खासदार नवनीत राणा यांच्यासोबत खासगी सचिव विनोद गुहे, माजी नगरसेविका सुमती ढोके व ज्योती सैरिसे यांनी राजापेठ ठाण्यात बसलेल्या डीसीपी विक्रम साळी यांची भेट घेतली.

एसीपी पाटील-खासदारांमध्ये चकमक

शाईफेक व जीवघेणा हल्लाप्रकरणी पोलीस कोठडीत असलेल्या विनोद येवतीकर याला डायलिसीससाठी सुपर स्पेशालिटी रुग्णालयात हलविण्यात आले. खासदार राणा शनिवारी दुपारी त्यांची भेट घेण्यासाठी सुपरला पोहोचल्या. मात्र, तेथे पोलिसांच्या निगराणीत व कोठडी ठोठावलेल्या आरोपीला भेटता येणार नाही, असे सांगण्यात आले. त्यामुळे तेथे सहायक पोलीस आयुक्त पूनम पाटील व खासदारांमध्ये चांगलीच शाब्दिक चकमक झाली. 

आयुक्तांसोबत झालेली घटना दुर्दैवी आहे. लोकप्रतिनिधी म्हणून आयुक्त आष्टीकर व त्यांच्या पत्नी यांना भेटून सांत्वन करायचे होते. आयुक्तांना मात्र राजकारण करायचे आहे. ते काही राजकीय लोकांना भेटतात आणि खासदारांची भेट नाकारतात, हे अनाकलनीय आहे. 
- नवनीत राणा, खासदार

छोटेखानी बैठकीतून कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवले
खासदार नवनीत राणा या शनिवारी अमरावतीत पोहोचल्यानंतर त्यांनी ‘गंगा-सावित्री’ निवासस्थानावर कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या. यावेळी छोटेखानी बैठकीत युवा स्वाभिमानचे मोजकेच पदाधिकारी, नगरसेवक, महिला कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. खासदार नवनीत राणांनी जोशपूर्ण विचार मांडले. अशी कितीही संकटे आली तरी राणा दाम्पत्य माघार घेणार नाही. आमदार रवि राणा यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाल्याप्रकरणी कार्यकर्त्यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या. यावेळी संजय हिंगासपुरे, जयवंत देशमुख, शैलेंद्र कस्तुरे, आशिष गावंडे, विनोद गुहे, सुमती ढोके, ज्योती सैरीसे, गणेशदास गायकवाड, अजय जयस्वाल आदी उपस्थित होते.

पुतळा त्याच जागी बसविणार
राजापेठ उड्डाणपुलावर त्याच जागी रितसर परवानगी घेऊन छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसविणार, असा निर्धार खासदार नवनीत राणा यांनी केला. परवानगीसाठी अर्ज सादर केले असतानाही महापालिका आयुक्तांनी पुतळा हटविण्यासाठी घाई केली. आता परवानगी घेऊन त्याच जागी पुतळा बसवून शिवप्रेमींची मागणी पूर्ण करू, असे खासदार म्हणाल्या.
 

 

Web Title: MP seeks 'damage control'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.