इर्विनमधील केंद्रीय लॅब सुरू करण्याच्या हालचालींना वेग,  आरोग्य उपसंचालकांनी केली लॅबची पाहणी

By उज्वल भालेकर | Published: February 22, 2024 09:38 PM2024-02-22T21:38:35+5:302024-02-22T21:39:05+5:30

या लॅबचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Moves to set up central lab in Irvine speed up, Deputy Director of Health inspects lab | इर्विनमधील केंद्रीय लॅब सुरू करण्याच्या हालचालींना वेग,  आरोग्य उपसंचालकांनी केली लॅबची पाहणी

इर्विनमधील केंद्रीय लॅब सुरू करण्याच्या हालचालींना वेग,  आरोग्य उपसंचालकांनी केली लॅबची पाहणी

अमरावती : जिल्हा सामान्य रुग्णालय (इर्विन) येथे बांधकाम पूर्ण झालेल्या केंद्रीय लॅब सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. गुरुवारी आरोग्य उपसंचालक डॉ. कमलेश भंडारी यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट देऊन येथील केंद्रीय लॅबची पाहणी केली. त्यामुळे येथे आवश्यक असलेली यंत्रसामग्री लवकरच प्राप्त होणार असल्याचे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. या लॅबचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने ७ फेब्रुवारी २०२४ रोजी डॉ. कमलेश भंडारी यांची अकोला येथील आरोग्य उपसंचालक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीनंतर डॉ. कमलेश भंडारी यांनी पहिल्यांदाच जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट घेतली. यावेळी त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद नीरवणे तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले यांच्या सोबत जिल्ह्यातील आरोग्य सुविधा संदर्भात चर्चा केली. तसेच त्यांनी इर्विन येथे बांधकाम पूर्ण झालेल्या केंद्रीय लॅबचीदेखील पाहणी केली. राज्यातील चार जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर उभारण्यात येणाऱ्या केंद्रीय लॅबपैकी ही एक लॅब आहे. या लॅबचे बांधकाम पूर्ण झाले असून, मनुष्यबळ तसेच काही यंत्रसामग्रीच्या अभावामुळे ही लॅब अजूनही कार्यान्वित झालेली नाही. ही लॅब कार्यान्वित झाल्यानंतर रुग्णांसाठी २४ तास ही लॅब सुरू राहणार आहे. त्यामुळे ही लॅब कार्यान्वित करण्याच्या अनुषंगानेच आरोग्य उपसंचालक यांनी या लॅबची पाहणी केली. लॅबसाठी आवश्यक यंत्रसामग्री याठिकाणी मिळणार असून, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने या लॅबचे उद्घाटन होणार असल्याची बोलले जात आहे.

लॅब सुरू करण्याच्या अनुषंगाने लॅबच्या बांधकाम तसेच उपलब्ध यंत्रसामग्रीची पाहणी केली. उर्वरित यंत्रसामग्री काही केंद्र स्तरावरून, तर काही स्थानिक स्तरावरून लवकरच प्राप्त होतील. लॅबचे उद्घाटन लवकरच होणार आहे, मात्र तारीख निश्चित झालेली नाही.
- डॉ. कमलेश भंडारी, उपसंचालक, आरोग्य सेवा, अकोला
 

Web Title: Moves to set up central lab in Irvine speed up, Deputy Director of Health inspects lab

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.