‘टोलमुक्त महाराष्ट्र’साठी आंदोलन
By Admin | Updated: March 23, 2015 00:33 IST2015-03-23T00:33:42+5:302015-03-23T00:33:42+5:30
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक काळात जनतेला ‘टोलमुक्त महाराष्ट्र’ करण्याचे आश्वासन दिले होते.

‘टोलमुक्त महाराष्ट्र’साठी आंदोलन
अमरावती : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक काळात जनतेला ‘टोलमुक्त महाराष्ट्र’ करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र या आश्वासनाची पूर्तता अद्यापपर्यंत करण्यात आली नाही. परिणामी शासनकर्त्याना त्यांनी दिलेल्या आश्वासनाची आठवण राहावी, यासाठी मंगळवारी २४ मार्च रोजी टोल वसुली बंद आंदोलन केले जाणार असल्याची माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हृषीकेश वैद्य यांनी रविवारी पत्रपरिषदेत दिली.
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे २४ मार्च रोजी राज्यव्यापी आंदोलन केले जात आहे. याच श्रृखंलेत शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने नागपूर महामार्गावरील नांदगाव पेठ स्थित टोल नाक्यावर मंगळवारी टोल वसुली न करता वाहने पाठविली जातील. या आंदोलनाची माहिती पोलीस प्रशासन, टोल वसुली कंत्राटदारांना देण्यात आली आहे. कायदा सुव्यवस्था अबाधित राहावा, यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी प्रशासनाला सहकार्य करणार आहेत. सकाळी ११ ते ५ वाजतादरम्यान टोल नाक्यावर कोणत्याही वाहन चालकांकडून टोल वसूल करु देणार नाही. हे आंदोलन राज्यभर असून शासनकर्त्यांना केवळ त्यांनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करुन जनतेला दिलासा द्यावा. अन्यथा टोल बंद करता येत नसेल तर जनतेची जाहीर माफी मागावी, असे वैद्य म्हणाले. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री फडणविस यांनी राज्यातील टोल नाके काही तांत्रिक, आर्थिक व न्यायालयीन अडचणींमुळे बंद करता येणार नाही, असे विधान केले आहे. मात्र निवडणूक काळात दिलेल्या आश्वासनांमुळेच जनतेनी भरभरुन मते दिलीत. आता शासनकर्ते दिलेल्या आश्वासनापासून दूर जात आहेत. ही जनतेची दिशाभूल आहे. दिलेल्या शब्दाला जागा, महाराष्ट्र टोलमुक्त करा, असा इशारा ऋषिकेश वैद्य यांनी दिला आहे. हे आंदोलन महाराष्ट्राच्या घोषणेची आठवण करुन देते तथा महाराष्ट्रातून टोल हद्दपार करणे तसेच यासंदर्भातील निर्णय चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनात घेतला जावा, अशी मागणी करीत राष्ट्रवादी युवक काँग्रेस २४ मार्च रोजी आंदोलन करुन शासनकर्त्यांचे लक्ष वेधतील, असे ऋषिकेश वैद्य यांनी सांगितले. यावेळी रायुकाँचे शहराध्यक्ष गजानन रेवाळकर, प्रदेश सचिव विनय कडू यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)