बिच्छन नदीच्या विकासासाठी हालचाली

By Admin | Updated: May 3, 2015 00:24 IST2015-05-03T00:24:42+5:302015-05-03T00:24:42+5:30

गुजरातमधील साबरमती व मुंबई येथील मिठी नदीच्या विकासाच्या धर्तीवर परतवाड्यातील बिच्छन नदीच्या ....

Movement for the development of the river Bichhin | बिच्छन नदीच्या विकासासाठी हालचाली

बिच्छन नदीच्या विकासासाठी हालचाली

पर्यावरण संतुलन राखले जाणार : नगरविकास राज्यमंत्र्यांनी दिली तत्त्वत: मान्यता
अचलपूर : गुजरातमधील साबरमती व मुंबई येथील मिठी नदीच्या विकासाच्या धर्तीवर परतवाड्यातील बिच्छन नदीच्या विकासासाठी शासनस्तरावर हालचालींना वेग आला आहे. त्यासाठी बिच्छन नदी प्रकल्प आराखड्याचे जनक राजेश उभाड प्रयत्नशील आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांची भेट घेतली. त्यांनीही या प्रकल्पाला तत्त्वत: मान्यता दिली आहे.
परतवाड्याच्या मध्यातून बिच्छन नदी वाहते तिच्यावर धरण बांधले असल्याने तिचे पात्र सध्या कोरडे आहे. शहरातील सांडपाण्यामुळे ती गटारगंगा झालेली आहे. तिचा विकास केल्यास तिला बारमाही स्वच्छ पाणी राहून पर्यावरणही संतुलित राहू शकते. याकरिता गुजरात राज्यातील साबरमती व मुंबई येथील मिठी नदीप्रमाणे बिच्छन नदीचा विकास करण्यासाठी राजेश उभाड यांनी शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहे. मागील चार महिन्यांपूर्वी नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांचा परतवाडा येथे नागरी सत्कार आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी प्रास्ताविकपर भाषणातून उभाड यांनी हा मुद्दा रेटून धरला होता. तसेच आता या प्रकल्पासाठी नुकतीच रणजित पाटील यांची मुंबई येथे जाऊन भेट घेतली. अंदाजे १८० कोटी रूपये या प्रकल्पाला खर्च येणार असल्याने केंद्र सरकारकडून ७० टक्के व राज्य सरकारकडून ३० टक्के निधी मिळू शकतो. पर्यावरण विभागाचे निदेशक पाटील यांनीही हा मुद्दा उचलून धरला आहे. तसेच भाजप सरकार नद्यांच्या विकासाकडे जास्त भर देत आहे. नद्यांच्या विकासाच्या बाबतीत केंद्र सरकारची काही मार्गदर्शक तत्त्वे आहेत. त्यानुसार हा प्रकल्प प्रस्ताव तयार करून नगरपालिकेच्या ठरावासह मंत्रालयात पाठवावा, असे रणजित पाटील यांनी उभाड यांना सांगितले. केंद्र सरकारच्या नदी विकास धोरणांतर्गत अशा प्रकल्पांना जेथे सौंदर्यीकरण व त्याची उपयोगिता या दोन्ही गोष्टी साकारली जाऊ शकतात, अशांना केंद्र सरकार ७० टक्के व ३० टक्के निधी नगरपालिका किंवा राज्य शासनाकडून प्राप्त होऊ शकतो. (शहर प्रतिनिधी)

सौंदर्यीकरणासाठी
होऊ शकते मदत
या प्रकल्पामुळे शहर सौंदर्यीकरण, रस्त्यावरील दुकानदारांना हक्काच्या जागा, बेरोजगारांना रोजगाराची संधी, पार्किंगसाठी मोठ्या अवजड वाहनांना जागा, वाहतुकीची सुरक्षितता, अपघाताला आळा, आरोग्य संवर्धन, पर्यावरणाचे संतुलन आदी समस्या मार्गी लागू शकतात. शहर सांैदर्यीकरणासाठीसुध्दा यामुळे मदत होऊ शकेल.

हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी नगरविकास राज्यमंत्री पाटील स्वत: लक्ष घालीत असून गरज भासल्यास पर्यावरणमंत्री जावडेकर यांची भेट घेण्याची तयारी दाखविली आहे. बिच्छन नदीवरील हा प्रकल्प तडीस नेण्यासाठी सर्व बाबी शुभ संकेत देत आहेत. या प्रकल्पामुळे अनेक समस्या सुटतील यासाठी आता नगरसेवक, लोकप्रतिनिधी यांचीही मदत लागणार असून सर्वांनी सकारात्मकता दाखविली आहे. नामदार पाटील यांच्या भेटीच्या वेळी वास्तूशास्त्रज्ञ अमित अग्रवाल हेसुद्धा उपस्थित होते. त्यांनीही अनेक चांगले मुद्दे मांडले.
- डॉ. राजेश उभाड, बिच्छन नदी विकास प्रकल्प आराखड्याचे जनक.

Web Title: Movement for the development of the river Bichhin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.