कर्जमाफीसाठी सेनेचे आंदोलन
By Admin | Updated: March 12, 2017 00:29 IST2017-03-12T00:29:22+5:302017-03-12T00:29:22+5:30
राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी, या मागणीसाठी शहरासह जिल्ह्यात सर्वदूर शिवसेनेच्यावतीने शनिवारी चक्काजाम आंदोलन करण्यात आले.

कर्जमाफीसाठी सेनेचे आंदोलन
जिल्ह्यात ठिकठिकाणी चक्काजाम : शिवसैनिक ताब्यात
अमरावती : राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी, या मागणीसाठी शहरासह जिल्ह्यात सर्वदूर शिवसेनेच्यावतीने शनिवारी चक्काजाम आंदोलन करण्यात आले. येथील रहाटगाव टि पार्इंटवर शिवसैनिक चक्काजाम करत असताना त्यांना नांदगाव पेठ पोलिसांनी ताब्यात घेतले. तर परतवाडा रस्त्यावरील आष्टी फाट्यावर काही शिवसैनिकांनी चक्काजाम आंदोलन करून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी बुलंद केली.
केंद्र व राज्य शासनाने जिल्हा बँकांवर घातलेली बंधने आणि नोटबंदीमुळे शेतकरी हवालदिल झाला असून शिवसेनेने त्याविरुध्द संसद ते सडक असे आंदोलन पुकारले आहे. त्या अनुषंगाने शनिवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास शिवसेनेचे जिल्हाप्रमुखद्वय संजय बंड आणि प्रशांत वानखडे यांच्या नेतृत्वात नागपूर मार्गावरील रहाटगाव टिपार्इंटजवळ शेकडो शिवसैनिक एकत्र आले होते. येथे रस्त्यावर निदर्शने करण्यात आली. यावेळी माजी जिल्हा प्रमुख नाना नागमोते, राजेश वानखडे, आशीष धर्माळे आदींसह अनेक शिवसैनिकांची उपस्थिती होती. तसेच पोलिसांचा व्यापक बंदोबस्तही होता.
परतवाड्यातही आंदोलन
शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमी भाव द्यावा व शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी शनिवारी सकाळी ११ वाजता शिवसेनेने अमरावती-परतवाडा मार्गावरील चांदूर बाजार नाक्यावर रास्ता रोको आंदोलन केले. शिवसेनेचे शहर प्रमुख किशोर कासार यांच्या नेतृत्वात बाजार समितीचे उपसभापती कुलदीप काळपांडे संचालक पोपट घोडेराव, आशिष सहारे, नरेंद्र पडोळे, नगराध्यक्ष सुनीता फिस्के, नगरसेवक नरेंद्र फिस्के, विनय चतूर, मनीष वर्मा, नंदकिशोर काळे यांनी सहभाग नोंदविला.
वलगावात चक्का जाम
शिवसेनेच्या कर्जमाफी आंदोलनाच्या पार्श्वभूमिवर जिल्ह्यात विविध ठिकाणी व्यापक पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. वलगाव नजीकच्या आष्टी फाट्यावर चक्काजाम आंदोलन करण्याची पूर्व सूचना शिवसैनिकांनी वलगाव पोलिसांना दिली होती. त्यानुसार दहा ते पंधरा शिवसैनिकांनी या फाट्यावर आंदोलन करत या मार्गावरील वाहतूक थांबविली. वलगावचे ठाणेदार दत्ता गावडे यांनी त्या शिवसैनिकांना ताब्यात न घेता विनाकारवाई सोडून दिले.
तिवस्यात महामार्गावर वाहनांच्या रांगा
पीकविमा योजनेच्या अनुदान यादीमध्ये असणाऱ्या चुकांची दुरुस्ती करण्याची मागणी करीत भाजपा शासन शेतकऱ्यांबद्दल उदासीन धोरण अवलंबित असल्याचा आरोप करीत तिवसा येथे अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख दिनेशनाना वानखडे यांचे नेतृत्वात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. शिवसेनच्या आंदोलकांनी रस्त्यावरील वाहने अडविल्याने महामार्गावर वाहनाच्या रांगा लागल्या होत्या. आंदोलकांमध्ये तालुका प्रमुख प्रदीप गौरखेडे, पंचायत समिती सदस्य श्याम देशमुख, नगरसेवक अनिल थूल, सतीश पारधी, चंदन बावरी, सुधीर गोंडसे, पंकज वानखडे, सचिन डाखोडे, पुरुषोत्तम मुंदळा, दिलीप चोधरी, मुरलीधर आकोटकर, प्रभाकर शेळके, अजय आमले उपस्थित होते.
दर्यापूर-आकोट मार्गावर रास्ता रोको
शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळावा व संपूर्ण कर्जमाफी करून सातबारा कोरा करावा, अशी मागणी करीत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी स्थानिक बाजार समितीसमोर रास्तारोको आंदोलन केले. आंदोलनाचे नेतृत्व बाजार समितीचे सभापती बाबाराव बरबट, नेते गजानन वाकोडे, विधानसभा समन्वयक रवि कोरडे यांनी केले. यावेळी गोपाल अरबट, सतीश साखरे, बबन विल्हेकर, राजेंद्र देशमुख, भैय्या बरबट, राहुल कंवर, संजय पानझडे, गणेश साखरे आदी उपस्थित होते. यावेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. आंदोलनाच्यावेळी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.