वेतनासाठी संगणक परिचालक संघटनेचे आंदोलन
By Admin | Updated: November 12, 2014 22:36 IST2014-11-12T22:36:47+5:302014-11-12T22:36:47+5:30
जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतींमध्ये कार्यरत असलेल्या संग्राम कक्षातील कंत्राटी संगणक परिचालकांचे वेतन रखडल्यामुळे जिल्ह्यातील १०० पेक्षा अधिक संगणक परिचालकांनी बुधवारी जिल्हा

वेतनासाठी संगणक परिचालक संघटनेचे आंदोलन
अमरावती : जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतींमध्ये कार्यरत असलेल्या संग्राम कक्षातील कंत्राटी संगणक परिचालकांचे वेतन रखडल्यामुळे जिल्ह्यातील १०० पेक्षा अधिक संगणक परिचालकांनी बुधवारी जिल्हा परिषदेवर धडक देऊन मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भंडारी यांना निवेदन सादर केले.
जिल्ह्यातील १४ पंचायत समित्यांमध्ये संग्राम कक्षात संगणक परिचालक म्हणून कंत्राटी तत्त्वावर ८०० कर्मचारी कार्यरत आहेत. मात्र या कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळत नाही. याशिवाय कंत्राटी पद्धत रद्द करुन सर्वच परिचालकांना शासन सेवेत सामावून घ्यावे, सध्या मिळत असलेले वेतन द्विमासिक अथवा त्रैमासिक पद्धतीने द्यावे, शासन निर्णयानुसार प्रतीमहा ८ हजार रुपये मानधन देण्यात मिळावे, ग्रामपंचायतीच्या संग्राम कक्षाचे आॅनलाईन कामकाज करण्याकरिता इंटरनेटची मर्यादा रद्द करुन सदर इंटरनेट योजना अमर्यादित करावी व हायस्पिड इंटरनेट जोडणी द्यावी, अशा विविध मागण्यांसाठी या कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेवर धडक दिली.
दरम्यान या संदर्भात शासनाकडे योग्य तो पाठपुरावा करण्याचे आश्वासन मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भंडारी यांनी आंदोलनकर्त्यांना दिले.
आंदोलनामध्ये संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल वाडी, दिनेश वाठोडकर, विशाल चिखलीकर, दीपक पोवार, मयुर कांबळे, राहुल इंगोले, सचिन धरपाल, शुभम भालेराव, कीर्ती ठाकरे, शीतल ठवळी, सविता कानडे, स्वप्निल मुंदावने, अतुल चौधरी, अजय इंगळे, आशिष वैराळे यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांचा समावेश होता. (प्रतिनिधी)