१० दिवसांपासून आंदोलन : नागरिक अवैध सावकारांच्या दारी
By Admin | Updated: March 11, 2016 00:33 IST2016-03-11T00:33:15+5:302016-03-11T00:33:15+5:30
केंद्र शासनाच्या निर्णयाविरोधात सराफा व्यावसायिकांनी पुकारलेल्या बंद नंतरही मागण्या मान्य होत नसल्याने गेल्या १० ..

१० दिवसांपासून आंदोलन : नागरिक अवैध सावकारांच्या दारी
चांदूरबाजार : केंद्र शासनाच्या निर्णयाविरोधात सराफा व्यावसायिकांनी पुकारलेल्या बंद नंतरही मागण्या मान्य होत नसल्याने गेल्या १० दिवसांपासून सराफा बाजार बंदमुळे लग्नसमारंभाकरिता सोने खरेदी करणाऱ्याची, गहाण ठेवणाऱ्यांची तसेच दागिने बनविणाऱ्या कारागिरांवर उपासमारीचे संकट ओढवले आहे.
शासनातर्फे दागिन्यावर लावण्यात आलेली एक्साईज ड्युटी, दागिने आयात ड्युटीत केलेली वाढ आदीच्या विरोधात सराफा व्यावसायिकांनी बेमुदत बंदचे आवाहन करीत देशभरात बंद पुकारला. या बंदला सराफा व्यावसायिक एकजूट होत गेल्या १० दिवसापासून आपली प्रतिष्ठाने बंद ठेवलेली आहे. यामुळे दररोज होणारी कोट्यावधीची उलाढाल थांबली आहे. या व्यवसायामुळे दागिने बनविणारे कारागीर, दागीने दुरुस्त करणारे कारागीर तसेच व्यावसायिक यांना या बंदची चांगलीच झळ पोहचत आहे.
सध्या सर्वीकडे लग्नसराईची धुम सुरू आहे. फक्त एप्रिल महिन्यातच लग्नाची धुम असल्याने साधारण परिस्थिती असलेला माणूस सुद्धा आपल्या मुलीच्या लग्नात आपल्या ऐपतीप्रमाणे सोने खरेदी करतो. हे दागीने आपल्या पसंतीच्या डिजाईननुसार तयार करुन घेण्याची पद्धत सुरू आहे. त्यामुळे अनेक जन लग्नापूर्वीच दागिने तयार करण्याकरिता आताच आॅर्डरी देतात. तर अनेक जन आपल्या पोटाला चिमटा घेवून हे कार्य पार पाडण्याकरिता घरातील जुने सोने मोडून आपल्या लेकीच्या लग्नाकरिता सोन्याचे दागिने घेतात.
नुकताच शेतीचा हंगाम संपला असून नगदी पीक म्हणून तूर, हरभरा, संत्रा पिकाचे पैसे शेतकऱ्याजवळ आले आहे. पेरणीकरिता गहाण ठेवलेले घरच्या लक्ष्मीचे दागीने सराफा व्यावसायिकाकडून सोडविण्याकरिता व्यवसायिकांचा दुकानकडे चकरा मारीत आहे. मात्र गेल्या १० दिवसांपासून सतत बंद असलेले सराफा बाजारमुळे आल्यापावली परत जावे लागत आहे. तसेच आपल्या गरजा पूर्ण करण्याकरिता ग्रामीण भागातील साधारण नागरीक आपल्याकडील सोने, चांदी गहाण ठेवण्याकरिता सराफा बाजारात जात आहे. मात्र बंद बाजारामुळे अखेर त्यांना अवैध सावकारांच्या दारी जायची वेळ येत आहे. (तालुका प्रतिनिधी)