राष्ट्रीय महामार्गावर मोटर दुरुस्तीचे जाळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:12 IST2021-03-07T04:12:22+5:302021-03-07T04:12:22+5:30
---------------- जुळ्या शहराचे आरोग्य धोक्यात अचलपूर : शहरासह ग्रामीण भागात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. डासांचा वाढता प्रादुर्भाव आणि वातावरणीय ...

राष्ट्रीय महामार्गावर मोटर दुरुस्तीचे जाळे
----------------
जुळ्या शहराचे आरोग्य धोक्यात
अचलपूर : शहरासह ग्रामीण भागात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. डासांचा वाढता प्रादुर्भाव आणि वातावरणीय बदलांमुळे रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आजही शहरातील, गावातील गटारांची, नाल्यांची योग्य पद्धतीने स्वच्छता नाही. नगरपालिकेसह ग्रामपंचायत स्तरावर संबंधित यंत्रणेकडून परिणामकारक फवारणी व धुरळणी करण्यात आलेली नाही.
-----------
दुकानांसमोर शेड लावून अतिक्रमण
चांदूरबाजार : शहरातील राष्ट्रीय महामार्ग, अप्रोच रोड, रिंग रोड, मेन रोड तसेच शहरातील मुख्य चौकात अतिक्रमण वाढले आहे. अनेक दुकानदारांनी दुकानासमोर टिन शेड लावून वर्दळीची जागा वा फुटपाथची जागा बळकावली आहे. त्या पार्श्वभूमिवर रहदारीस अडथळा ठरणारे अतिक्रमण हटविण्याची गरज आहे.
----------------------------------------------
रेतीतस्करांनी पोखरले नद्यांचे उदर
करजगाव : वाळूमाफिया भरदिवसा मजूर पाठवून त्यांच्याकडून रेती उपसा करून गाळून ठेवतात. त्यामुळे तालुक्यातील नद्यांचे उदर पोखरले आहे. रोज रात्रीच्या वेळी ट्रॅक्टरद्वारे रेतीची वाहतूक केली जाते. एक ब्रास रेती ७ हजार ५०० रुपयांप्रमाणे विकतात. चांदूरबाजार तालुक्यातील रेतीघाटाचे लिलाव झाले नसताना नदीपात्रातील वाळूचा अवैध उपसा चर्चेचा विषय बनला आहे.
-------------------
धारणीत नवनिर्मित ओट्यांवर अतिक्रमण
धारणी : येथील सर्वे नंबर १२६ मध्ये बाजार ओटे तयार झाले आहेत. या ओट्यांचा रीतसर लिलाव होण्यापूर्वीच अनेकांनी त्यांच्यावर कब्जा केलेला आहे. गर्भश्रीमंत भाजीपाला व्यावसायिकांकडून जागा व्यापली जात असल्यामुळे गरिबांवर अन्याय होत आहे. याकडे नगरपंचायत प्रशासनाने लक्ष देण्याची आवश्यकता आहे.
-------------------
वरूड तालुक्यातील रस्त्याची दुरवस्था
वरूड : तालुक्यातील पुसला ते लोहदरा या रस्त्याची दुर्दशा झाली आहे. या रस्त्यावर खड्डे पडल्याने चालतानादेखील तारेवरची कसरत करावी लागत आहे. रस्त्यात खड्डे पडल्याने अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या रस्त्यावरून शेतकऱ्यांची व शालेय विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी आहे.
------
‘त्या’ दुकानांवर कारवाई केव्हा?
चांदूरबाजार : शहरातील वाढते अतिक्रमण पाहता पालिकेने धडक कार्यवाही करीत मुख्य बाजारपेठेमधील अतिक्रमण जमीनदोस्त केले. त्यात नियमित कर भरणाऱ्या घुमटीधारक दुकानदारांची दुकानेही पाडण्यात आली. मात्रा स्टेट बँकसमोरील ८४ दुकानांना अभय देण्यात आले. ‘ते’ अतिक्रमण केव्हा पाडणार, असा नागरिकांचा सवाल आहे.
------------------------------------
मजुरांअभावी शेती व्यवसाय तोट्यात
शेंदुरजनाघाट : जिल्ह्यात बऱ्याच वर्षांपासून स्थानिक मजूर कमी झाल्याने येथील शेतकरी परप्रांतीय शेतमजूर आणून शेती व्यवसाय करीत आहेत. स्थानिक मजुरांच्या कमी होत असलेल्या संख्येने शेती व्यवसाय मोठ्या प्रमाणावर अडचणीत येण्याची चिन्हे दिसत आहेत. खेड्यातील अनेकांकडे आता अवघी एक - दोन एकर शेती राहिली आहे. त्यामुळे मजुरांची संख्या रोडावली. तर, ग्रामीण भागातील काही मजूर शहरात बारमाही बांधकाम मजूर म्हणून काम करीत असल्याचा परिणामही शेतकऱ्यांवर पडला.
-----------------
हातुर्णावासीयांना पुनर्वसनाची प्रतीक्षा
राजुराबाजार : १९९१ साली वर्धा नदीला आलेल्या पुराचा फटका हातुर्णा गावातील नागरिकांना बसला. या पुरात अनेक घरे वाहून गेली. या वेळी हातुर्णा येथील १६९ नागरिकांचे पुनर्वसन करण्याचे आश्वासन शासनाने दिले होते. मात्र ३० वर्षांनंतर प्रत्यक्षात १६९ पुनर्वसित नागरिकांना पट्ट्यांचे वाटप झालेले नाही. पट्टे न मिळाल्याने पुरात खचलेल्या घरात राहणे नागरिकांच्या नशिबी आले.
--------------------
खेड येथे प्रवासी निवारा केव्हा?
रिद्धपूर : मोर्शी ते चांदूर बाजार मार्गावरील खेड ग्रामस्थांना प्रवासी निवाऱ्याची प्रतीक्षा आहे. येथे रस्त्याचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. मात्र प्रवासी निवारा बांधण्यात आला नाही. चांदूर बाजार ते मोर्शी मार्गावरील सर्व गावांत प्रवासी निवारे बांधण्यात आले. प्रवासी निवारा बांधण्यात न आल्यामुळे येथील प्रवाशांना उन्हात, पावसाळ्यात भिजत उभे राहावे लागते.
---------------
मेळघाटातील आरोग्य विभागातील जागा रिक्त
परतवाडा : मेळघाटाच्या धारणी व चिखलदरा तालुक्यांत डॉक्टरांसह विविध कर्मचारी अशा एकूण १११ जागा रिक्त आहेत. धारणी येथील ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करून ते शंभर खाटांचे करण्यात यावे व रक्तपेढीची मागणीदेखील आहे. कुपोषणाचा कलंक लागलेल्या मेळघाटात आरोग्य विभागाच्या तज्ज्ञ डॉक्टरांसह मानसेवी डॉक्टरांच्या जागा रिक्त आहेत.
-----------
अस्वच्छतेबाबत नगरपालिकेने करावा दंड
चांदूरबाजार : जे नागरिक कचरापेटी असतानादेखील पेटीबाहेर किंवा इतरत्र कचरा टाकतात अशा नागरिकांवर कारवाई करण्याची गरज आहे. पालिकेने नागरिकांना दंड आकारल्यास उघड्यावर कचरा फेकण्याचे प्रमाण आटोक्यात आणता येईल. बाजारपेठेमधील गांधी चौक, बेलोरा चौक, स्टेट बँक परिसर, नगरपालिका परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिक कचरा उघड्यावर टाकत आहेत.
----------------
ग्रामीण भागात आजही जात्याचे महत्त्व कायम
कावली वसाड : एकेकाळी सर्वच प्रकारच्या पिठासाठी प्रत्येकाच्या घरात जाते वापरले जात होते. आज ग्रामीण भागात काही प्रमाणात जात्याला महत्त्व प्राप्त झाल्याचे दिसत आहे. तूर, चनाडाळ आजही ग्रामीण भागातील महिला जात्यावरून दळून घेतात. आढ्यावर टाकलेले जाते स्वच्छ करून त्याचा वापर केला जात आहे.
-----------------
फोटो पी ०६ शहाापूर फोल्डर
शहापुरातील अस्वच्छतेने आरोग्य धोक्यात
असदपूर : लगतच्या असदपूर येथील वॉर्ड क्रमांक २ मधील मुख्य रस्त्यावर नागरिक कचरा आणून टाकत असल्याने तेथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्या आठवडीबाजाराकडे जाणाऱ्या रस्त्यावरील कचरा स्वच्छ करावा, तसेच या भागातील नाल्या प्रवाही करण्यात याव्यात, अशी मागणी गावातील राधेश्याम चऱ्हाटे, रामेश्वर चऱ्हाटे, चेतन कावरे, अशोक कावरे यांनी सरपंचांकडे केली आहे. कचरा टाकणाऱ्यांविरुद्ध ग्रामपंचायतीने कारवाई करावी, डासांपासून ग्रामस्थांची सुटका करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
-------------------------