सर्वाधिक मतांनी बोंडे, अल्प मतांनी जगताप विजयी
By Admin | Updated: October 19, 2014 23:13 IST2014-10-19T23:13:50+5:302014-10-19T23:13:50+5:30
जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघांपैकी मोर्शी मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार अनिल बोंडे यांचा विजय हा सर्वाधिक मताधिक्याचा ठरला. सर्वात कमी मतांच्या आघाडीने धामणगाव

सर्वाधिक मतांनी बोंडे, अल्प मतांनी जगताप विजयी
अमरावती : जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघांपैकी मोर्शी मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार अनिल बोंडे यांचा विजय हा सर्वाधिक मताधिक्याचा ठरला. सर्वात कमी मतांच्या आघाडीने धामणगाव मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार वीरेंद्र जगताप विजयी झाले.
मोर्शीत भाजप उमेदवार बोंडे यांना ७१,६११ मते मिळाली. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार माजी कृषिमंत्री हर्षवर्धन देशमुख यांचा ४०,१६२ मतांनी पराभव केला. रविवारी (१९ आॅक्टोबर) सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर अनिल बोंडे हे पहिल्या फेरीपासून आघाडीवर राहिले. अनिल बोंडे हे २००४ मध्ये शिवसेनेचे उमेदवार असताना अल्पशा मतांनी पराभूत झाले होते. त्यानंतर हा मतदारसंघ भाजपाच्या वाट्याला गेल्याने २००९ मध्ये अपक्ष निवडणूक लढवून विजयी झाले. या पाच वर्षांच्या काळात त्यांनी विदर्भ जनसंग्राम संघटनेच्या माध्यमातून गावागावांत निष्ठावान कार्यकर्त्यांची फळी तयार केली. तसेच मतदारसंघात दररोज संपर्कात राहिले. याच संघटनेच्या माध्यमातून ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, सहकार, नगरपालिका निवडणुकीत संघटनेचा प्रभावी वापर केला व ते सतत चर्चेत राहिले, याचाही त्यांना फायदा झाला आहे.
लोकसभा निवडणुकीत अनिल बोंडे यांनी भाजपाच्या उमेदवाराला खुलेआम समर्थन देऊन प्रचार केला.
युती तुटल्यानंतर त्यांनी भाजपाचे उमेदवार म्हणून निवडणूक लढविली. यामध्ये त्यांचा जिल्ह्यात सर्वाधिक मताधिक्क्याने विजय झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे हर्षवर्धन देशमुख व काँग्रेसचे नरेशचंद्र ठाकरे यांचा मतदारसंघात संपर्कात सातत्याचा अभावदेखील अनिल बोंडे यांच्या पथ्यावर पडला आहे. देशमुखांना ३१,४४९ व ठाकरे यांना ३०,२०७ मते मिळाली. शिवसेनेचे उमेश यावलकर २७,१२२ मते घेऊन चौथ्या क्रमांकावर राहिले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचार सभा चांदूररेल्वे येथे झाली. मात्र, मोदी लाटेला रोखण्यात धामणगाव मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार वीरेंद्र जगताप यांना यश आले. जिल्ह्यात सर्वात कमी ९७४ मतांच्या फरकाने त्यांचा निसटता विजय झाला आहे.
मोदीच्या सभेनंतर भाजप उमेदवार अरुण अडसड यांचा विजय निश्चित मानला जात होता. परंतु वीरेंद्र जगताप यांनी ग्रामीण भागातील त्यांची पकड मजबूत असल्याचे पुन्हा दाखवून देत हॅट्ट्रीक साधली आहे. तसेच धामणगाव मतदारसंघालाच लागलेल्या तिवसा मतदारसंघातदेखील मोदींच्या सभेचा प्रभाव जाणवला नाही. या मतदारसंघात काँग्रेसच्या यशोमती ठाकूर विजयी झाल्यात.
पहिल्या फेरीपासून अडसड व जगताप यांच्यात काट्याची लढत होती. अनेक फेरीमध्ये दोन्ही उमेदवार मागेपुढे राहिलेत. मात्र यामध्ये अंतिम फेरीत जगताप यांनी बाजी मारली. त्यांना ७०,८७९ मते मिळाली तर अरूण अडसड यांना ६९,९०५ मते मिळाली. बसपाचे अभिजित ढेपे यांना २९१२१ मते मिळाली ते तिसऱ्या स्थानावर व शिवसेनेचे सिद्धेश्वर चव्हाण १४,१२८ मते घेऊन चौथ्या क्रमांकावर राहिले आहे. (प्रतिनिधी)