मोर्शी तालुक्यात १२० रोहित्र बसविणार

By Admin | Updated: July 20, 2015 00:06 IST2015-07-20T00:06:34+5:302015-07-20T00:06:34+5:30

राज्य वीज वितरण कंपनीव्दारे मोर्शी तालुक्यातील प्रलंबित कृषिपंपांना डिसेंबर २०१५ पर्यंत वीजपुरवठा केला जाणार आहे.

In the Morshi taluka, 120 launches will be installed | मोर्शी तालुक्यात १२० रोहित्र बसविणार

मोर्शी तालुक्यात १२० रोहित्र बसविणार

दिलासा : प्रलंबित कृषिपंपांना होणार वीजपुरवठा
रोहितप्रसाद तिवारी  मोर्शी
राज्य वीज वितरण कंपनीव्दारे मोर्शी तालुक्यातील प्रलंबित कृषिपंपांना डिसेंबर २०१५ पर्यंत वीजपुरवठा केला जाणार आहे. वीज वितरणात सुधारणा करण्याकरिता जवळपास १२० रोहित्रे बसविण्यात येणार आहेत.
ग्राहक संपर्क अभियानात वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता एन. टी.चौधरी यांनी ही माहिती दिली. समारोपीय कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून उपविभागीय अधिकारी ललितकुमार वऱ्हाडे, तहसीलदार बक्षी, नगरसेवक अजय आगरकर उपस्थित होते.
अतिभार रोहित्रांवरील भार कमी करण्यासोबतच शेतकऱ्यांना योग्य दाबाने वीजपुरवठा व्हावा या हेतूने १०० केव्हीएचे १२० नवीन रोहित्र तालुक्यात बसविण्यात येणार आहेत. २०१२-१३ आणि १३-१४ या दोन वर्षांतील प्रलंबित कृषि पंपांना सप्टेबर महिणा अख्ोर तर ३१ मार्च २०१५ पर्यंत पैश्याचा भरणा केलेल्या शेतकऱ्यांना ३१ डिसेंबरपर्यंत वीजपुरवठा केला जाणार आहे. या कामांचे कंत्राटसुध्दा देण्यात आले आहे. धडक सिंचन योजनेअंतर्गत ज्यांनी रक्कम भरली अशा शेतकऱ्यांना सर्वोच्च प्राधान्याने वीजपुरवठा केला जाणार आहे. कृषी पंपाकरिता विजेची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ५९१ आहे, त्यांची यादी तयार करून ज्यांनी रक्कम भरल्याची पावती वीज वितरण कंपनीकडे सादर केली नाही, आणि यादीत नाव नाही, त्यांनी भरणा केल्याचा पुरावा सादर केल्यास त्यांचे नावही यादीत समाविष्ट करण्यात येईल, असेही कार्यकारी अभियंता यांनी यावेळी सांगितले. डिसेंबर २०१५ अखेर कृषिपंपाचा अनुशेष शंभर टक्के दूर होणार आहे.
इन्फ्रा-२ योजनेअंतर्गत पाळा-भीवकुंडी येथील ५ एमव्हीए क्षमतेचे वीज उपकेंद्र जून २०१६ अखेर पूर्णत्वास जाणार आहे. कृषिपंपाच्या वीजपुरवठ्याकरिता ५ खांबांपर्यंतच्या जोडण्या मंजूर करण्याचे अधिकार कनिष्ठ अभियंत्यांना देण्यात आले आहे. धडक सिंचन योजना, रोजगार हमी योजना, दिनदयाल उपाध्याय ग्रामीण ज्योती योजना, डीपीडीसी योजनाअंतर्गत विविध कामे प्रस्तावित करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. ग्राहक संपर्क अभियानात विजेच्या बिलासंदर्भात १४, अतिभार रोहित्रांबाबत २१, शेतीपंपाच्या प्रलंबितप्रकरणी ७, वीज संयंत्र देखभालीचे ९, पथदिव्यांचे २, उपकेंद्रांच्या मागणीबाबतचे २ अशा ३२ तक्रारी आणि सूचना प्राप्त झाल्यात. उपस्थित अधिकाऱ्यांनी ग्राहकांच्या समस्यांचे निराकरण करण्याचे प्रयत्न या वेळी केले. ग्राहक संपर्क अभियानाकरिता कार्यकारी अभियंता एन. टी.चौधरी, उपकार्यकारी अभियंता संजय खाटके, बारई, शेख, सहायक अभियंता कडू व कनिष्ठ अभियंता उपस्थित होते.

Web Title: In the Morshi taluka, 120 launches will be installed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.