मोर्शीतील राज्यमहामार्ग प्रकाशमय
By Admin | Updated: February 18, 2015 00:10 IST2015-02-18T00:10:23+5:302015-02-18T00:10:23+5:30
शहरातील महाराष्ट्र कॉलनी ते नळा नदी पर्यंतचा मुख्य राज्यमहामार्ग पथदिव्यांमुळे प्रकाशमान झाला असल्याने मोर्शीकर नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

मोर्शीतील राज्यमहामार्ग प्रकाशमय
मोर्शी : शहरातील महाराष्ट्र कॉलनी ते नळा नदी पर्यंतचा मुख्य राज्यमहामार्ग पथदिव्यांमुळे प्रकाशमान झाला असल्याने मोर्शीकर नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
शहरातील मुख्य राज्य महामार्गावर रस्ता दुभाजक आणि पथ दिव्यांची मागणी नागरिकांव्दारे सातत्याने केल्या जात होती. विदर्भ वैधानिक विकास मंडळाच्या अनुदानातून यापूर्वी शासकीय रुग्णालय परिसर ते पोलिस ठाणे परिसरापर्यंत पथदिव्यांची व्यवस्था करण्यात आली होती. तथापि निधी अभावी पुढील पथदिव्यांची कामे होवू शकली नव्हती.
नगर परिषदेची आर्थिक स्थिती पाहता पुढील मार्गावरील पथदिव्यांची निर्मिती करणे शक्य नव्हते. दरम्यान मागील वर्षी तत्कालिन नगराध्यक्षा रेश्मा नितीन उमाळे यांनी सागर मेघे यांच्या मोर्शी नप भेटीप्रसंगी पथदिव्यांचा प्रश्न रेटला होता. शासनाच्या वैशिष्टयपूर्ण कार्य योजनेतून पथदिव्यांची निर्मीती करता येत असल्याचे पाहून तत्कालिन वित्त मंत्री राजेंद्र मूळक यांच्या आणि तत्कालिन खासदार दत्ता मेघे सहकार्याने ही योजना मान्य करण्यात आली आणि अनुदान प्राप्त झाले होते.
या योजनेतून मुख्य राज्य महामार्गावरील महाराष्ट् कॉलनी ते नळा नदीपरीसर पर्यंत पथदिव्यां करीता ५० खांब आणि प्रत्येक खांबावर दोन मिळून एकूण १०० दिव्यांची व्यवस्था करण्यात आली. या अतिरिक्त प्रकाश व्यवस्थे करीता विजेच्या दोन डीबी ची आवश्यकता होती, मुख्य राज्य महामार्ग खोदून जमीनीखालून केबल टाकण्या करीता सार्वजनिक बांधकाम विभागाला रस्त्याची नूकसान भरपाई नप ला करावयाची होती. या दोन बाबी करीता लक्षावधी रुपयाचा खर्च नगर परिषदेचा होणार होता. याच कारणामुळे जवळपास ८ महिणे पर्यंत प्रत्यक्षात पथदिवे सुरु होवू शकले नव्हते. नागरीकांच्या सततच्या रेटयामुळे नप प्रशासनाने साबा विभागाकडे ३ लक्ष ७१ हजार रुपयाचा भरणा केला. तर दूसरीकडे राज्य विज वितरण कंपनीने जनहिताचा विचार काता विजेच्या विद्यमान भार क्षमतेला विभागून तात्पूरत्या स्वरुपात विज जोडणी करुन दिली. त्यामुळे संपूर्ण मार्ग सध्या प्रकाशमान झाला आहे.