मोर्शी पालिकेत मजूरच उपसतात मैला
By Admin | Updated: May 11, 2014 22:51 IST2014-05-11T22:51:20+5:302014-05-11T22:51:20+5:30
मजुरांकडून मैला उपसून घेणे, हा गंभीर स्वरुपाचा गुन्हा असतानाही स्थानिक नगरपरिषद प्रशासनाव्दारे सेप्टीक टँकमधील मैला मजुरांच्या हाताने उपसून टँकरव्दारे कचरा डेपोत नेला जातो.

मोर्शी पालिकेत मजूरच उपसतात मैला
मोर्शी : मजुरांकडून मैला उपसून घेणे, हा गंभीर स्वरुपाचा गुन्हा असतानाही स्थानिक नगरपरिषद प्रशासनाव्दारे सेप्टीक टँकमधील मैला मजुरांच्या हाताने उपसून टँकरव्दारे कचरा डेपोत नेला जातो. हा प्रकार बंद व्हावा व यांत्रिक मैला उपसक यंत्राची सोय नगरपरिषद प्रशासनाने तातडीने करावी, अशी मागणी पालिकेचे शिक्षण सभापती प्रदीप कुºहाडे यांनी केली आहे. शहरातील नागरिकांच्या घरातील सेप्टीक टँकमधील मैला उपसण्याकरिता नगरपरिषदेव्दारे कोणतीही ठोस यंत्रणा अस्तित्वात नाही. मजुरांकडून मैला उपसून टँकरव्दारे कचरा डेपोमध्ये नेऊन टाकला जातो. परंतु ही पध्दत शासनाने बेकायदेशीर ठरविली आहे. ही गंभीर बाब हेरून गत तीन वर्षांपूर्वी तत्कालीन नगराध्यक्ष विद्या ढवळे यांनी शासनाकडे ‘मैला उपसक यंत्र’ खरेदी करण्याचा प्रस्ताव संचालक नगरपरिषद प्रशासन यांचेकडे दाखल केला होता. त्याला ३ फेब्रुवारी २०१२ रोजी मान्यताही मिळाली होती. जिल्हाधिकार्यांनी २५ एप्रिल २०१२ रोजी प्रशासकीय मान्यता दिली. परंतु त्यानंतर नगरपरिषदेत सत्तांतर झाल्यामुळे दुर्लक्ष झाल्याने प्रस्ताव बारगळला. नगराध्यक्ष रेश्मा उमाळे यांच्या कार्यकाळात शिक्षण सभापती प्रदीप कुºहाडे यांनी या प्रकरणात लक्ष घालून जानेवारी २०१४ मध्ये ‘मैला उपसक यंत्र’ खरेदीचा प्रस्ताव मान्यतेकरिता नगरपरिषदेमार्फत नप प्रशासन व जिल्हाधिकार्यांकडे पाठविला. पालिका मुख्याधिकारी व नप प्रशासनाने यासंदर्भात पाठपुरावा करणे आवश्यक असताना मुख्याधिकार्यांनी कोणताही पाठपुरावा केला नाही. त्यामुळे हा प्रस्ताव वरिष्ठांकडे पडून आहे. (तालुका प्रतिनिधी)