मोर्शीच्या पाणीपुरवठ्यासाठी तांत्रिक कर्मचारी नाही
By Admin | Updated: August 2, 2014 23:52 IST2014-08-02T23:52:59+5:302014-08-02T23:52:59+5:30
उपविभागीय अधिकारी ललितकुमार वऱ्हाडे यांनी नगरपरिषद पाणीपुरवठा योजनेच्या जल शुद्धीकरण केंद्राला भेट देऊन जल शुद्धीकरणाची प्रक्रिया जाणून घेतली. तांत्रिक आणि प्रशिक्षित कर्मचारी नसतानाही

मोर्शीच्या पाणीपुरवठ्यासाठी तांत्रिक कर्मचारी नाही
मोर्शी : उपविभागीय अधिकारी ललितकुमार वऱ्हाडे यांनी नगरपरिषद पाणीपुरवठा योजनेच्या जल शुद्धीकरण केंद्राला भेट देऊन जल शुद्धीकरणाची प्रक्रिया जाणून घेतली. तांत्रिक आणि प्रशिक्षित कर्मचारी नसतानाही पाणीपुरवठा योजना राबविली जात असल्याचे, शिवाय पाणीपुरवठा योजना जीवन प्राधिकरणकडे हस्तांतरित होणे गरजेचे असल्याचे मुख्याधिकारी सुमेध अलोणे यांनी सांगितले.
नागरिकांचे आरोग्य धोक्यात मोर्शीत अशुद्ध पाणीपुरवठा’ या शीर्षकाखाली 'लोकमत'ने वृत्त प्रकाशित केले. त्या अनुषंगाने उपविभागीय अधिकारी ललितकुमार वऱ्हाडे यांनी गुरुवारी न.प. पाणी पुरवठा योजनेच्या जलशुध्दीकरण केंद्राला भेट दिली. यावेळी मुख्याधिकारी अलोणे, बांधकाम विभागाचे अभियंते उपस्थित होते.
मुख्याधिकारी अलोणे यांनी जलशुध्दीकरण प्रक्रियेची माहिती देताना कॅरीफाय व्हॉल्व्ह आणि अशुध्द पाणी जमा होणाऱ्या टाक्यातून पाणी वाहून नेण्याच्या प्रक्रियेतील दोषामुळे अशुध्द पाणी पुन्हा प्रक्रिया केलेल्या शुध्द पाण्यात मिसळत होते. त्यामुळे काही दिवस लोकांना चांगले पाणी मिळू शकले नसल्याचे विशद केले. आता व्हॉल्व्ह दुरुस्त झाल्याचे आणि अशुध्द पाणी ज्या टाक्यात गोळा होते, त्या टाक्यातील गाळ काढण्याचे काम सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.
पावसाळयाच्या दिवसांत अशुध्द पाण्यामुळे जलजन्य आजार वाढीस लागण्याची शक्यता विशद करतानाच असे झाले तर नगरपरिषद प्रशासन आणि अधिकारी जबाबदारी टाळू शकणार नाही, याची स्पष्ट जाणीव उपविभागीय अधिकारी वऱ्हाडे यांनी मुख्याधिकारी सुमेध अलोणे यांना करुन दिली. पाण्याचा प्रश्न नागरिकांच्या आरोग्याशी निगडित असल्यामुळे या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देण्याच्या सूचनाही दिल्या.