मोर्शीत मालवाहू वाहनाची मोपेडला धडक, युवक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:13 IST2021-07-27T04:13:05+5:302021-07-27T04:13:05+5:30
दोघे गंभीर जखमी, जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार मोर्शी : येथील रामजीबाबानगर चौकात रविवारी रात्री १२.३० वाजता झालेल्या अपघातात २० ...

मोर्शीत मालवाहू वाहनाची मोपेडला धडक, युवक ठार
दोघे गंभीर जखमी, जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार
मोर्शी : येथील रामजीबाबानगर चौकात रविवारी रात्री १२.३० वाजता झालेल्या अपघातात २० वर्षीय तरुण दगावला, तर उर्वरित दोघे गंभीर जखमी अवस्थेत अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत आहेत. निखिल प्रदीप पांडे (२०, रा. रामजीबाबानगर, मोर्शी) असे मृताचे नाव आहे.
पोलीस सूत्रांनुसार, मोर्शी ते वरूड रोडवरील ढाब्याहून जेवण करून परत येत असताना विरुद्ध दिशेने भरधाव येणाऱ्या मालवाहू वाहनाच्या जबर धडकेत मोपेडवर असलेले निखिलसह रूपम उर्फ रोहित संजय कंगाले (२१, रा. श्रीकृष्णपेठ, मोर्शी) व अमोल दिलीप शेरेकर (२१, रा. रामजीबाबानगर, मोर्शी) हे जबर जखमी झाले. त्यांना तात्काळ पुढील उपचाराकरिता अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आले. निखिलची प्रकृती गंभीर असल्याने त्याला तात्काळ नागपूर येथील रुग्णालयात रवाना करण्यात आले. तेथे त्याचा मृत्यू झाला. निखिल हा मोर्शी तालुक्यातील येवती येथील रहिवासी असून, हा शिक्षणासाठी मोर्शी येथील त्याच्या आजीच्या घरी राहत होता. अपघातग्रस्त तिन्ही तरुणांची आर्थिक स्थिती कमकुवत असल्याने मोलमजुरी करून शिक्षण घेत असल्याचे समजते. रात्री रस्त्याने वर्दळ नसल्याचा फायदा घेत धडक देणाऱ्या वाहनासह चालकाने घटनास्थळावरून पलायन केले. याप्रकरणी मोर्शी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तपास करीत आहेत.