मोर्शीत संत्रा प्रक्रिया प्रकल्प
By Admin | Updated: October 2, 2015 02:28 IST2015-10-02T02:28:48+5:302015-10-02T02:28:48+5:30
विदर्भाच्या कॅलिफोर्नियातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची संत्रा प्रक्रिया केंद्राची मागणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मोर्शीत संत्रा प्रक्रिया प्रकल्प
वरुड : विदर्भाच्या कॅलिफोर्नियातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची संत्रा प्रक्रिया केंद्राची मागणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उचलून धरली. वर्षभरात मोर्शीमध्ये संत्रा रस प्रक्रिया केंद्र सुरु होईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
शेतकऱ्यांच्या पाठीशी विदर्भाचा भूमिपूत्र आणि राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मी खंबीरपणे उभा आहे. तेव्हा कोणतेही संकट आले तरी शेतकऱ्यांनी आत्महत्या करु नये, असे भावनिक आवाहन ना.देवेंद्र फडणवीस यांनी केले. स्थानिक बाजार समितीच्या प्रांगणात आयोजित कृषी व संत्रा महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी कृषी तथा महसूलमंत्री ना.एकनाथ खडसे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून पालकमंत्री प्रवीण पोटे, खा.रामदास तडस, खा. आनंदराव अडसूळ, आ. अनिल बोंडे, वसुधा बोंडे, दर्यापूरचे आ.रमेश बुंदेले, माजी आमदार दादाराव केचे, छात्रसंघाचे निशांत गांधी, नगराध्यक्ष रविंद्र थोरात, नगराध्यक्ष सविता खेरडे, फलोत्पादन आयुक्त मल्होत्रा, राष्ट्रीय बागवानी मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक ए.के.सिंग, अतिरिक्त मुख्य सचिव डी.के.जैन, विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजुरकर, जिल्हाधिकारी किरण गित्ते, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापिठाचे कुलगुरु रविप्रकाश दाणी, भारतीय संत्रा उत्पादक महासंघाचे अध्यक्ष पी.जी.जगदीश, आदी मान्यवर उपस्थित होते.
जुन्या सरकारचे उष्टे काढता-काढता काही कालावधी नक्कीच जाईल. मात्र, या शासनाने वर्षभरात शेतकऱ्यांच्या हिताचा भविष्यकालीन कार्यक्रम हाती घेतला आहे.
सरंक्षित सिंचनाकरिता ठिबक आणि तुषार सिंचनावर ७५ टक्के अनुदानाची घोषणा केली. शेतकऱ्यांकडे २५ टक्के रक्कम नसेल तर कर्जरूपात ती बँकेला देणे भाग पाडू, असेही त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांनी पाण्याचा योग्य वापर करताना जलयुक्त शिवाराकरिता स्वत:हून पुढे आले पाहिजे. तेव्हाच पाण्याची पातळी वाढेल.
तसेच संत्र्याला राजाश्रय देण्याकरिता व संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याकरिता यावर्षी किमान दहा शहरांत स्टॉल उघडण्यासाठी जागा देणार असल्याचे व कंटेनर पाठवून परदेशातील बाजारपेठेत संत्र्याचे महत्त्व पटवून दिले जाईल, असेही त्यांनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी)
भाजप कार्यकर्त्यांना हाकलल्याने नाराजीचा सूर
माजी नगराध्यक्ष सुभाष गोरडे, जिल्हा सचिव प्रकाश देशमुख, प्रभाकर काळे, देवेंद्र बोडखे यांच्यासह भाजपची काही मंडळी सभास्थळाच्या मागे उभी असताना सुरक्षा यंत्रणेने त्यांना बाहेर काढले. त्यामुळे कार्यक्रमस्थळी नाराजीचा सूर होता. काटेकोर सुरक्षा यंत्रणेबद्दल अनेकांनी नाराजी व्यक्त केली. शेतकऱ्याच्या कार्यक्रमात शतकऱ्यांनाच डावलल्याचा आरोप देखील काहींनी केला. बराच वेळ ही धुसफूस सुरू होती.
फळबाग योजनेकरिता हेक्टरी १ लाख- ना.खडसे
विदर्भातील शेतकऱ्यांना संत्रा फळबाग योजनेचा लाभ घेता यावा, संत्राबागा नव्या जोमाने उभ्या राहाव्यात म्हणून मनरेगा अंतर्गत हेक्टरी एक लाख रुपये देऊन फळबाग योजना राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. याकरिता शेतकऱ्यांनी स्वकष्टातून रोपवाटिका व फळबागा तयार करून संत्र्याचे उत्पादन घ्यावे. याकरिता शेतकऱ्यांना फळबागा जोपासण्याकरिता शासन १०० टक्के अनुदान देणार, अशी घोषणा कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनी केली. ‘ माझ्या मुलीचे सासर शेंदूरजनाघाट येथील असून मुख्यमंत्रीसुध्दा विदर्भाचेच असल्याने तुम्हाला काही कमी पडणार नाही’, अशी कोटी खडसेंनी केली आणि उपस्थितांमध्ये हशा पिकला. त्यांच्या या वक्तव्याला मुख्यमंत्र्यांनीदेखील दाद दिली.